सचिन आणि विश्वचषक २०११

कोणताही खेळाडू जेव्हा एखाद्या खेळामध्ये आपला प्रवास सुरू करतो, तेव्हा त्या खेळातील सर्वोच्च स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न त्याने उरी बाळगले असते. क्रिकेटसारख्या सांघिक खेळातही आपल्या देशाला विजेतेपद जिंकून देण्यासाठी खेळाडू जीव की प्राण करत असतात. असेच एक स्वप्न आपल्या सचिन तेंडुलकरने हाती बॅट घेताना पाहिले होते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो संपूर्ण क्षमतेने लढला. फक्त लढलाच  नाही तर आपले लक्ष्य गाठण्यासाठी त्याने आपले सोरे कर्तब पणाला लावले. त्यामुळेच तुमच्या-माझ्यासारख्या आजच्या पिढीला विश्वचषक विजयाचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.
विश्वचषक २०११ हा सचिनचा शेवटचा विश्वचषक असेल असा अंदाज सर्वांनाच होता, १९९२ पासून विश्वचषकात सहभाग घेणाऱ्या सचिनने अनेक विक्रमांना गवसणी घातली. मात्र विश्वचषक विजयाचे त्याचे स्वप्न अजूनही अधुरेच राहिले होते. दक्षिण आफ्रिकेत २००३ साली झालेल्या विश्वचषकात हातातोंडाशी आलेल्या विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर २००७ च्या वेस्ट इंडीज विश्वचषकात पहिल्याच फेरीत बाद होण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढवली होती. त्यामुळे भारतीय भूमीत होणाऱ्या २०११ च्या विश्वचषकात काय होणार यावर साऱ्या जगाची नजर होती. त्यातच सचिनचा शेवटचा विश्वचषक म्हणून ही उत्सुकता शिगेला लागली होती.
सचिन-गांगुली-द्रविड-लक्ष्मण-कुंबळे या ‘फॅब्युलस फाईव्ह’मधून केवळ सचिन या विश्वचषकात खेळत होता. क्रिकेट समीक्षक व टिकाकारांच्या मते भारत हा विश्वचषक जिंकण्याची शक्यता फार कमी होती. मात्र नेहमीप्रमाणे देशाच्या नजरा सचिनवरच खिळलेल्या. लोकांना विश्वास होता की आपला क्रिकेटचा देव यावेळी आपल्यावर विजेतेपदाचा आशिर्वाद देणारच ! सचिननेही आपल्या साऱ्या भक्तांना ‘तथास्तू’ म्हणत आपल्या बॅटची ‘लीला’ साऱ्या जगाला दाखवली. या स्पर्धेत सचिनने ९ सामन्यांत २ शतके व २ अर्धशतकांच्या साहाय्याने एकूण ४८२ धावा केल्या. या सर्वांमध्ये पाकिस्तानविरूद्ध अतिशय बिकट परिस्थितीत केलेल्या ८५ धावा आपण कुणीच विसरू शकत नाही.
सचिनच्या फलंदाजीसह इतर खेळाडूंच्या या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळेच भारताने विश्वविजय नोंदवला. त्याच्या सहा विश्वचषकांमध्ये सहभागी होण्याचे सार्थक या विश्वचषकात झाले होेते. क्रिकेटच्या ‘देवा’कडून क्रिकेटवेड्या भक्तांना मिळणारा हा ‘प्रसाद’ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. ‘भगवान के घर देर है पर अंधेर नही’ असे
म्हणत या क्षणासाठी भारतीयांनी तब्बल २८ वर्षे वाट पाहिली आणि देवानेही करोडो भक्तांच्या भक्तीला मान देत त्यांची इच्छा पूर्ण केली.
म्हणतातच ना, अगर किसी चीज को पुरे दिल से चाहो, तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने के कोशिश मे लग जाती है. त्याचप्रमाणे याठिकाणी मी असं म्हणेन की भगवान को कोई चीज पुरे दिल से मांगो, तो सारी कायनात झुकाकर वो उसे तुम्हे दिलाने की कोशिशमे लग जाता है.

लेखक- हर्शल अकुडे 
( [email protected] )

(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)