बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: साईप्रणीतला कांस्यपदक; उपांत्यफेरीत बसला पराभवाचा धक्का

भारताचा बॅडमिंटनपटू साईप्रणीतला आज(24 ऑगस्ट) बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यफेरीत अव्वल मानांकीत जपानच्या केंटो मोमोटाकडून पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

यावर्षीच्या अर्जून पुरस्कारासाठी निवड झालेल्या भारताच्या साईप्रणीतला मोमोटाने 21-13, 21-8 अशा फरकाने पराभूत केले. या लढतीत पराभव स्विकारावा लागला असला तरी साईप्रणीतने भारताला बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीमध्ये 36 वर्षांनंतर पदक मिळवून देण्याचा पराक्रम केला आहे.

याआधी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला 1983 मध्ये पुरुष एकेरीत प्रकाश पदुकोण यांनी पहिल्यांदा पदक मिळवून दिले होते. त्यांनीही कांस्यपदक मिळवले होते.

आज बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये साईप्रणीत विरुद्ध मोमोटो यांच्या पार पडलेल्या 41 मिनिटाच्या उपांत्य सामन्याची सुरुवात साईप्रणीतने चांगली केली होती. त्याने पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला 5-3 अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर मोमोटोने चांगली लढत देत या सेटच्या मध्यंतरापर्यंत 11-10 अशी आघाडी घेतली.

यानंतरही त्याने साईप्रणीतला कोणतीही संधी दिली नाही. त्यानंतर साईप्रणीतला केवळ 3 पॉइंट्स मिळवता आले. हा सेट मोमोटाने 21-13 असा सहज जिंकत सामन्यात आघाडी घेतली.

यानंतर दुसऱ्या सेटमध्येही 2-2 अशी सुरुवातीला बरोबरी असताना मोमोटाने पुढे साईप्रणीतवर वर्चस्व ठेवायला सुरुवात केली. मोमोटाने साईप्रणीतला दुसऱ्या सेटमध्ये वरचढ होऊच दिले नाही. त्याने या सेटच्या मध्यंतरापर्यंत 11-3 अशी भक्कम आघाडी घेतली.

त्यानंतरही साईप्रणीतचा संघर्ष सुरु होता मात्र हा सेटही 21-8 असा सहज जिंकत मोमोटाने अंतिम फेरीत प्रवेश केला. तर साईप्रणीतला स्पर्धेबाहेर पडावे लागले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

अरुण जेटलींच्या निधनानंतर आजी-माजी क्रिकेटपटूंनी भावनिक ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

विकेट्सचे ‘अर्धशतक’ पूर्ण करताच बुमराहचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

विंडीजविरुद्ध ५ विकेट्स घेत इशांत शर्माने केली हरभजन, कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी