हाँग काँग ओपन: सायना नेहवालची विजयी सुरुवात

काल पासून सुरु झालेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीजमध्ये भारताची फुलराणी सायना नेहवालने विजयी सुरुवात केली आहे. सायनाने महिला एकेरीच्या या सामन्यात डेन्मार्कच्या मत्ते पौलसेन हीचा पराभव केला.

या लढतीत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने जरी विजय मिळवला असला तरी जागतिक क्रमवारीत ४४ व्या स्थानी असणाऱ्या पौलसेन हिच्याकडूनही चांगलीच झुंज बघायला मिळाली.

४६ मिनिटे चाललेल्या या लढतीत पहिल्या सेटमध्ये सायनाने पौलसेनला २१-१९ अश्या फरकाने विजय मिळवत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेट मधेही पौलसेनने सायनाला चांगली लढत दिली होती परंतु सायनाने हा सेट अनुभवाच्या जोरावर २३-२१ अश्या फरकाने जिंकून सामनाही जिंकला.

सायनाचा दुसऱ्या फेरीतील सामना जागतिक क्रमवारीत ९ व्या क्रमांकावर असणाऱ्या चायनाच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे.