सिंधू, साईना, किदांबी श्रीकांत आणि बी.साई प्रणीत ऑस्ट्रेलियन ओपन सुपरसीरीजच्या उपांत्यफेरीत

भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि साईना नेहवाल ह्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपरसीरीजच्या उपांत्यफेरीत पोहचल्या आहेत. गुरुवारी झालेल्या सामन्यात त्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत उपांत्यफेरी गाठली.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या सिंधूने चीनच्या चेन शियाओशिनवर २१-१३, २१-१८ असा विजय मिळवला. रियो ओलिंपिक विजेत्या सिंधूने ४६ मिनिटे चाललेल्या या सामन्यात चेन शियाओशिनला एकदाही संधी दिली नाही आणि सरळ सेट मध्ये तिचा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला.

दुसऱ्या सामन्यात ऑलिम्पिक विजेत्या साईना नेहवालने सोनिआ चेहवर २१-१५, २०-२२, २१-१४ असा विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये जबदस्त सुरुवात करणाऱ्या साईनाला दुसरा सेट गमवावा लागला. २०-२२ असा ह्या चुरशीच्या सेटमध्ये साईनाने चांगली फाइट दिली. शेवटचा सेट जिंकण्यासाठी साईनाला विशेष कष्ट पडले नाही. तिने तो २१-१४ असा जिंकून सामना जिंकला.

अन्य सामन्यात भारताच्या किदांबी श्रीकांत आणि बी.साई प्रणीत यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी विजय मिळवून उपांत्यफेरी गाठली. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरीजमध्ये हे दोनही खेळाडू आमने सामने आले आहेत.