केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत साकेत मायनेनीचा मानांकीत खेळाडूवर विजय

युकी भांब्री व रामकुमार रामनाथन यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे| एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000 डॉलर +हॉस्पिटॅलिटी  केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनी याने स्लोव्हेनियाच्या अव्वल मानांकीत कावकीक ब्लाज याचा पराभव केला.

 युकी भांब्रीने ग्रेट ब्रिटनच्या जे क्लार्क याचा पराभव केला. तर चौथ्या मानांकीत रामकुमार रामनाथनने सर्बियाच्या पाचव्या मानांकीत निकोला मिलाजेविक याचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.

म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या साकेत मायनेनी याने स्लोव्हाकियाच्या जागतीक क्रमवारीत 98 व्या स्थानावर असलेल्या अव्वल मानांकित ब्लेज कावकीक याचा टायब्रेकमध्ये 7-6(7-5), 7-6(7-5) असा संघर्षपूर्ण पराभव करून दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. 

1तास 52मिनिटे चाललेल्या चुरशीच्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये साकेत याने आपल्या जोरदार सर्व्हिस व व्हॉली करत तिसऱ्या गेममध्ये कावकीकची सर्व्हिस रोखली व 3-1 अशी आघाडी घेतली. पण पुढच्याच गेममध्ये साकेतने आपली सर्व्हिस गमावली. साकेतने नेटजवळून जोरदार फटके परतावून लावत सहाव्या गेममध्ये कावकीकची सर्व्हिस भेदली व सामन्यात 4-2 अशी स्थिती निर्माण केली.

त्यांनंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये दहाव्या, अकराव्या गेममध्ये साकेतने दोन बिनतोड सर्व्हिस केल्या व हा सेट 7-6(7-5)असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये 6व्या गेममध्ये कावकीकने साकेतची, तर 7व्या गेममध्ये साकेतने कावकीकची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत सामन्यात 4-4 अशी बरोबरी साधली.

त्यांनंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. टायब्रेकमध्ये 5-1 अशा फरकाने साकेत आघाडीवर असताना कावकीकने चतुराईने खेळ करत साकेतची 7, 10व्या  गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यातील आपले आव्हान कायम ठेवले. पण साकेतने बिनतोड सर्व्हिस करत हा सेट 7-6(7-5)असा जिंकून विजय मिळवला.

जागतिक क्र.140 असलेल्या भारताच्या युकी भांब्री याने आपली विजयी मालिका कायम ठेवत जागतिक क्र.283 असलेल्या ग्रेट ब्रिटनच्या जे क्लार्क याचा 6-4, 6-0 असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. 30 वर्षीय युकीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच क्लार्कवर आपले वर्चस्व कायम राखले. पहिल्याच गेममध्ये युकीने क्लार्कची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत 2-0 अशी आघाडी घेतली.

क्लार्कने 4थ्या गेममध्ये युकीची सर्व्हिस रोखली व बरोबरी साधली. त्यानंतर युकीने बॅकहँण्ड व फोरहॅन्डचा सुरेख वापर करत क्लार्कची सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व पुढील दोन्ही गेममध्ये आपली सर्व्हिस राखत हा सेट 44 मिनिटात 6-4अशा फरकाने जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल टाकले.

दुसऱ्या सेटमध्येदेखील सामन्याच्या शेवटपर्यंत क्लार्कला सूर गवसला नाही. या सेटमध्ये युकीने तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये क्लार्कची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-0असा जिंकून विजय मिळवला.

जागतीक क्रमवारीत 148वा असलेल्या भारताच्या चौथ्या मानांकित रामकुमार रामनाथन याने जागतीक क्रमवारीत 156वा असलेल्या सर्बियाच्या पाचव्या मानांकित निकोल मिलोजेविक याचा 6-1, 7-5 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

एकतर्फी झालेल्या सामन्यात रामकुमार याने निकोलची दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात 5-0अशी आघाडी घेतली. 7व्या गेममध्ये 15-15 असे समान गुण असताना रामकुमारने दोन बिनतोड सर्व्हिस केल्या व हा सेट 6-1 अशा फरकाने सहज जिंकला. तर दुसरा सेट 7-5 असा जिंकुन उपांत्य फेरीत प्रवेश केला.

स्पेनच्या जागतीक क्रमवारीत 130व्या स्थानावर असलेल्या दुसऱ्या मानांकित ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास याने कझाकस्तानच्या नवव्या मानांकित अलेक्झांडर नेदोव्हेसोवचा 7-5 , 4-1 असा पराभव केला. पहिला सेटमध्ये ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास याने कडवी झुंज देत अलेक्झांडरचा 7-5 असा पराभव करून आधाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास हा 4-1 अशा फरकाने आधाडीवर असताना अलेक्झांडरने माघार घेतल्यामुळे हा सेट 4-1 असा जिंकून उपांत्य फेरी गाठली.

दुहेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक व क्रोटायाच्या अॅन्ट पावीक या जोडीने अमेरीकेच्या इवान किंग व ऑस्ट्रिलियाच्या लुकास मिडलर याचा 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

स्पेनच्या पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास या जोडीनी ग्रेट ब्रिटनच्या ब्रायडन क्लीन व ऑस्ट्रेलियाच्या मार्क पोलमन्स यांचा 6-2, 6-0 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल-एकेरी गट- उपांत्यपुर्व फेरी

साकेत मायनेनी(भारत) वि.वि कावकीक ब्लाज(स्लोव्हेनिया,1) 7-6(7-5), 7-6(7-5)

ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास(स्पेन,2) वि.वि अलेक्झांडर नेदोव्हेसेव(कझाकस्तान,9) 7-5, 6-1

युकी भांब्री(भारत,3) वि.वि जे क्लार्क(ग्रेट ब्रिटन) 6-4, 6-0

रामकुमार रामनाथन(भारत,4) वि.वि निकोला मिलाजेविक(सर्बिया,5) 6-1,7-5

 

दुहेरी गट- उपांत्यपुर्व फेरी

टोमीस्लाव्ह ब्रेकीक (बोस्निया)/ अॅन्ट पावीक(क्रोटाया) वि.वि इवान किंग(अमेरीका)/ लुकास मिडलर(ऑस्ट्रिलिया) 6-4, 6-2

पेद्रो मार्टिनेझ(स्पेन)/ ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास (स्पेन) वि.वि ब्रायडन क्लीन(ग्रेट ब्रिटन)/ मार्क पोलमन्स(ऑस्ट्रेलिया,2) 6-2, 6-0