कसोटी मालिकेत टीम इंडियाला रडवणारा सॅम करन आयपीएलमध्ये मालामाल…

आज(18 डिसेंबर) जयपूरमध्ये आयपीएल 2019चा लिलाव सुरु आहे. या लिलावात युवा खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची बोली लागली आहे. यामध्ये इंग्लंडचा 20 वर्षीय अष्टपैलू खेळाडू सॅम करनही कोट्याधीश झाला आहे.

त्याला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 7 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावत संघात सामील करुन घेतले आहे. करन हा मागील काही महिन्यांपासून चांगल्या लयीत खेळत आहे.

त्याला ऑगस्टमध्ये इंग्लंड विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीसाठी मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. या मालिकेत त्याने 7 डावात 272 धावा आणि 4 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच इंग्लंडने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केलेल्या श्रीलंका दौऱ्यातही करनने चांगली कामगिरी केली होती.

करनला आत्तापर्यंत आयपीएल खेळण्याचा अनुभव नसला तरी त्याने त्याच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत 47 ट्वेंटी20 सामने खेळले असून यात 478 धावा आणि 42 विकेट्स घेतल्या आहेत.

करन यावर्षीच्या आयपीएल लिलावात आत्तापर्यंतचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापेक्षा अधिक किंमत जयदेव उनाडकटला आणि वरुण चक्रवर्थी या खेळाडूंना मिळाली आहे. या दोघांनाही 8 कोटी 40 लाखांची बोली लागली आहे. उनाडकटला राजस्थान रॉयल्सने आणि चक्रवर्थीला पंजाब संघाने संघात घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

शिक्षणासाठी सोडलं होत क्रिकेट, आज ठरला सर्वात महागडा खेळाडू

पाच चेंडूत पाच षटकारांची बरसात करणारा मुंबईकर झाला कोट्याधीश

आयपीएल २०१९ लिलाव: २०१८ला सर्वात महागड्या ठरलेल्या खेळाडूला यावर्षीही मिळाली तितकीच मोठी किंमत