आयपीएलमध्ये भाग घेणारा तो ठरणार पहिलाच नेपाळी खेळाडू

बेंगलोर येथे काल पार पडलेल्या २०१८ च्या आयपीएल लिलावात दिल्ली डेअरडेविल्सने करारबद्ध केलेला संदिप लामिचने नेपाळकडून आयपीएलमध्ये सहभागी होणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

१७ वर्षीय लेगस्पीनर संदिप लामिचने पहिल्यांदा २०१६मध्ये बांग्लादेश येथे पार पडलेल्या अंडर -१९ विश्वचषक स्पर्धेवेळी प्रकाशझोतात आला. या स्पर्धेत आयर्लंड विरूद्धच्या सामन्यात हॅट्रिक बरोबरच स्पर्धेत १४ विकेट घेऊन नेपाळला इतिहासात पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचण्यात मोलाची कामगिरी बजावली.

लमिचनेच्या या कामगिरीची दखल घेऊन माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्क व संदिपचा आदर्श असणाऱ्या शेन वॉर्नने तोंडभरून कौतुक केले. त्याचबरोबर मायकेल क्लार्कने संदिपला त्याच्या ऑस्ट्रेलियातील क्रिकेट आकादमीमध्ये प्रशिक्षणाची संधी दिली.

यावेळी बोलताना मायकेल क्लार्क म्हणाला की,”संदिप लामिचने एक ऊत्कृष्ठ ऊदयनमुख क्रिकेटपटू आहे व तो क्रिकेटचा पुरेपूर आनंद घेतोय”.

संदिप लामिचनेला दिल्ली डेअरडेविल्स संघाने २० लाख या त्याच्या आधार मुल्य किमतीत तीन वर्षांसाठी करारबद्ध केले.यावरून दिसते की नेपाळसारख्या देशातील या तरूण क्रिकेटपटू जागतिक क्रिकेटमधे आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.