संदीप नरवालाचा प्रो कबड्डीमध्ये मोठा विक्रम

पुणे । काल पुणेरी पलटण संघ साखळी फेरीत शेवटच्या सामन्यात अगदी शेवटच्या मिनिटाला पराभूत झाला आणि अ गटात अव्वल रहायचे त्यांचे स्वप्न भंगले. परंतु याच संघातील संदीप नरवाल या खेळाडूने तरीही एक मोठा विक्रम केला.

प्रो कबड्डी इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आता संदीपच्या नावावर झाला आहे. त्याने प्रो कबड्डीच्या ५ मोसमात मिळून एकूण ८१ सामने खेळले आहेत.

यापूर्वी हा विक्रम संयुक्तपणे संदीप नरवाल आणि अजय ठाकूर यांच्या नावावर होता. दोघेही ८० सामने खेळले होते. संदीप गेले ४ सामने दुखापतीमुळे संघाबाहेर होता नाहीतर त्याच्या सामन्यांची संख्या निश्चित जास्त असती.

या मोसमात तरी संदीपचा हा विक्रम मोडणे अवघड आहे कारण अजय ठाकूर आणि राहुल चौधरी यांचे संघ पुढच्या फेरीत गेले नाहीत.

संदीपने प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात (१६), दुसऱ्या मोसमात (१६), तिसऱ्या मोसमात (१४), चौथ्या मोसमात (१६) आणि पाचव्या मोसमात (१९) असे सामने खेळला आहे. जर या मोसमात पुणेरी पलटण संघ अंतिम फेरीत पोहोचलाच तर या संघाला आणखी ४ सामने खेळायला मिळू शकतात आणि त्यामुळे संदीपच्या या विक्रम आणखी भर पडू शकते.

प्रो-कबड्डीत सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
८१ संदीप नरवाल
८० अजय ठाकूर
७९ राहुल चौधरी
७९ दीपक हुडा
७९ रिशांक देवाडिगा
७९ विशाल माने
७८ अनुप कुमार
७६ राजेश मोंडल
७६ मोहित चिल्लर