संजय टकलेमुळे युरोपीय रॅलीत महाराष्ट्राचे प्रथमच प्रतिनिधीत्व

पुणे । पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने लॅट्वियातील ताल्सी रॅलीत भाग घेतला आहे. शनिवारी रॅलीच्या दहा स्पेशल स्टेजेस होत आहे. युरोपीय रॅली मालिकेचा भाग असलेल्या या रॅलीत भाग घेणारा तो महाराष्ट्राचा पहिलाच स्पर्धक असेल.

संजयच्या जोडीला भारताचा अमित्रजीत घोष सुद्धा असेल. या दोघांमुळे भारतीय स्पर्धक या मालिकेत प्रथमच सहभागी होतील. 86 स्पर्धकांचा प्रतिसाद लाभलेली ही रॅली युरोपमधील प्रमुख स्पर्धांत गणली जाते.

संजयने गेल्या आठवड्यात इस्टोनियामधील थालीन रॅलीत भाग घेतला. तब्बल 23 स्पर्धकांना वेगवेगळ्या कारणांमुळे माघार घ्यावी लागली असताना संजयने रॅली यशस्वीरित्या पूर्ण केली.

संजय बाल्टीक मोटरस्पोर्टस प्रमोशनची फोर्ड फिएस्टा आर 2 कार चालवेल. तो एलआरसी 3 या क्लासमध्ये भाग घेईल. हा टू व्हील ड्राईव्ह कारचा गट आहे. लॅट्वियाचा एडगर्स स्वेन्सीस संजयचा नॅव्हीगेटर असेल.

रॅलीचे एकूण अंतर 301.59 किलोमीटर असेल. यातील स्पेशल स्टेजेसचे स्पर्धात्मक अंतर 98.94 किलोमीटर असेल.

संजयने सांगितले की, ब्रिटनच्या ग्रॅहॅम मिडीलटन यांच्या मार्गदर्शनानुसार मी या रॅलीत भाग घेत आहे. 11 देशांच्या 86 स्पर्धकांच्या सहभागामुळे रॅलीचा दर्जा वाढला आहे. गेल्या वर्षी या रॅलीला सर्वोत्तम रॅलीचा पुरस्कार मिळाला होता.

अशा रॅलीत भारताचे प्रतिनिधीत्व करणे हा एक मोठा बहुमान आहे. येथील रॅलीची परंपरा अर्ध्या शतकाहून जास्त कालावधीची आहे हे सुद्धा आवर्जून नमूद करावेसे वाटते. इस्टोनियातील रॅली पूर्ण केल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे.

पेस नोट्सचे स्वरुप आम्ही संक्षिप्त पण सुस्पष्ट केले आहे. पहिल्याच रॅलीत मी एडगर्सच्या साथीत नव्या पद्धतीशी व्यवस्थित जुळवून घेऊ शकलो. आता आमच्यामध्ये चांगला समन्वय निर्माण झाला आहे. एडगर्स लॅट्वियाचा असल्यामुळे त्याच्या अनुभवाचा या रॅलीत आणखी फायदा होईल.

संजयने तयारीविषयी सांगितले की, जुलैमधील फिनलंड रॅलीत भाग घेण्याबाबत मी आशावादी आहे. त्याआधी मला बरीच तयारी करावी लागेल. मित्सुबिशी मिराज आर 5 ही शक्तीशाली कार चालविण्यापूर्वी आर 2 कारसह सराव करावा, स्पर्धात्मक अंतर पूर्ण करण्याचा अनुभव वाढवावा असा सल्ला मिडीलटन यांनी दिला आहे. इस्टोनियाहून परतल्यानंतर मी बाल्टीक मोटरस्पोर्टसचे प्रमुख मार्टिन डेझेनीटीस यांच्यासह कार तांत्रिक पातळीवर सज्ज करण्यासाठी भाग घेतला.

संयोजक आरए इव्हेंट््सचे संचालक रेमंड्््स स्ट्रोक्स यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षांहून जास्त काळ येथे रॅलीची परंपरा आहे. इतक्या प्रदिर्घ कालावधीत संयोजक, स्पर्धक, रॅलीचे स्वरुप बदलले आहे. एक गोष्ट मात्र कायम आहे आणि ती म्हणजे रॅलीची लोकप्रियता. रॅली ऑफ चँपीयन्स असा लौकीक उत्तरोत्तर वृद्धींगत होत गेला आहे.

ताल्सी विभाग महापालिकेचे अध्यक्ष एडगर्स झेल्डेरीस यांनी सांगितले की, ताल्सी हा लॅट्वियातील एक सर्वाधिक निसर्गरम्य आणि रमणीय प्रांत मानला जातो. केवळ रेसिंग शौकीनच नव्हे तर या प्रांतातील जनतेसाठी रॅली हा जीवनाचा अविभाज्य घटक राहिला आहे.

खडीच्या (ग्रॅव्हेल) मार्गावर होणारी ही मोसमातील पहिल्या रॅलींमधील महत्त्वाची रॅली आहे. रॅली ऑफ चँपियन्स हे विशेषण आमच्यासाठी अभिमानास्पद आहे आणि ते अत्यंत सार्थ असेच आहे.

याचे कारण आमच्या रॅलीत भाग घेतलेले अनेक स्पर्धक आज जागतिक पातळीवर वेगवेगळ्या मालिकांमध्ये भाग घेताना दिसतात. प्रत्येक मार्गाचे वैशिष्ट्य आहे. मॉरडँगा येथे असंख्य वळणे आहेत. स्ट्रॅझ्डे येथील स्टेज जम्पचा थरार दाखविते. रॅलीची रंगत अनुभवण्यासाठी मी स्वतः तीन वर्षांपूर्वी नॅव्हीगेटर म्हणून भाग घेतला होता.