संजय टकलेला कंबोडियातील आंतरराष्ट्रीय रॅलीचे खास आमंत्रण

पुणे: पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याला कंबोडियातील पहिल्या आंतरराष्ट्रीय रॅलीचे खास आमंत्रण देण्यात आले आहे. उद्यापासून तीन दिवसांची ही रॅली होईल. खमेर रॅली रेड असे नामकरण करण्यात आले असून ही पहिलीच रॅली आहे.
 
कंबोडियाच्या ईशान्येकडील मोंदुलकिरी प्रांतात कम्पुचिया ऑटोस्पोर्ट रेसिंग एजन्सीने (केएआरए-कारा) रॅलीचे आयोजन केले आहे. त्यात आसियान प्रांतातील सुमारे 50 ड्रायव्हर सहभागी होतील. संजय हा आशियाई क्रॉस कंट्री विजेता असल्यामुळे त्याला आमंत्रित करण्यात आले.
 
काराचे महासंचालक पिओयू टेचलेंग यांनी सांगितले की, कंबोडियात रेसिंगला चालना देण्याचा आमचा उद्देश आहे. याशिवा मोंदुलकिरी प्रांत नैसर्गिक वैविध्याने नटला आहे. त्यामुळे रॅलीच्या माध्यमातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल.
 
मोंदुलकिरी हा प्रांत कंबोडियातील सर्वांत मोठा असून येथे सर्वाधिक लोकसंख्या आहे. येथे वनराजी मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय मोठे धबधबे सुद्धा आहेत.
 
काराचे उपाध्यक्ष हो सेथ्यूकुन यांनी सांगितले की, या रॅलीमुळे कंबोडियाच्या स्पर्धकांना आपल्या क्षमता, तंत्र आणि दर्जाचा अंदाज येईल.
 
रॅलीच्या तांत्रिक समितीचे सदस्य डॅवन वुथ्था यांनी सांगितले की, हे रॅलीचे पहिले वर्ष असल्यामुळे केवळ दोन स्पेशल स्टेज ठेवल्या आहेत. एकूण अंतर 90 ते 100 किलोमीटरच्या घरात आहे. कंबोडियात पूर्वी ट्युलिप तसेच रॅली मीटरचा अवलंब करून कधीही रॅली झालेली नाही.
 
रॅलीपूर्वी रॅली
 
संजयला रॅलीसाठी जाणण्यापूर्वी रॅली करावी लागली. त्याने डेलो स्पोर्ट या थायलंडमधील संघाकडून कार घेतली आहे. त्यामुळे तो पुण्याहून मुंबई मार्गे बँकॉकला दाखल झाला.  तेथून दीडशे किलोमीटर प्रवास करून तो संघासह रायोंगला दाखल झाला. रात्री मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तेथून थायलंड-कंबोडिया सीमा गाठण्यासाठी त्याला 200 किलोमीटर प्रवास करावा लागला. कंबोडियात प्रवेश केल्यानंतर अडीचशे किलोमीटर प्रवास करीत तो न्हॉम पेन्ह या राजधानीत दाखल झाला. तेथे त्याने मुक्काम केला. त्यानंतर सातशे किलोमीटर प्रवास करून तो पश्चिम कंबोडियामधील कोह हाँग येथे दाखल झाला. रात्री त्याने तेथे मुक्काम केला. त्यानंतर त्याने आठशे किलोमीटर प्रवास करून मोंदुलकिरी प्रांतात प्रवेश केला.
 
संजयच्या संघाचे मालक सी. द्रीविचावत हे सुद्धा रॅलीत सहभागी झाले आहेत. आधीच्या इसुझु फुकेट संघातील नॅव्हीगेटर मिनील थान्याफात हा नॅव्हीगेटर संजयने कायम ठेवला आहे. 
 
संजयने सांगितले की, यंदा मी मलेशियातील राष्ट्रीय मालिकेत दोन फेऱ्यांमध्ये भाग घेतला. कारच्या तांत्रिक बिघाडामुळे मला एका फेरीत निराश व्हावे लागले. रॅली पूर्ण करणे हे माझे पहिले ध्येय असते. काही वेळा कार तुम्हाला साथ देत नाही, तर काही वेळा तुमच्या चुकीमुळे तांत्रिक बिघाड होतो. आता मी नव्या संघाकडून कार मिळविली आहे. त्यामुळे इसुझु डीमॅक्स युटीलिटी कारमधून ही रॅली पूर्ण करण्यास माझे प्राधान्य राहील.