संतोष कुमार घोष ट्रॉफी १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत आयुष जेठवा, रोनित ठक्कर यांची शतके

के.आर.पी.इलेव्हन, दादर पारसी कॉलनी सुस्थितीत

मुंबई । सलामीचा डावखुरा आयुष जेठवा (१६१)आणि त्याने गौरव कुमारसह पाचव्या विकेटसाठी केवळ २३.२ षटकांमध्ये केलेली १६४ धावांची भागीदारी यामुळे के.आर.पी. इलेव्हनला शिवाजी पार्क जीमखान्याविरुद्ध ३०४ अशी चांगली धावसंख्या उभी करता आली.

स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित ७व्या संतोष कुमार घोष ट्रॉफी १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दादर पारसी कॉलनीचा रोनित ठक्कर आजचा दुसरा शतकवीर ठरला. मात्र त्याची फलंदाजी त्यामानाने बरीच संथ झाली.

रोनितने २०४ मिनिटे खेळपट्टीवर राहून नाबाद १०२ धावा केल्याने त्याच्या संघाला ९ बाद २४९ अशी मजल मारता आली. त्याचा सलामीचा साथीदार आदित्य वारंगनेही तेवढाच वेळ खेळून ५७ धावा केल्या. उद्या माझगाव क्रिकेट क्लबला त्यांचा डाव गुंडाळून कसे प्रत्युत्तर देता येते यावर या लढतीचा निकाल अवलंबून राहील.

मुंबई क्रिकेटची भविष्यातली पिढी घडविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याने बऱ्याच क्लबचे याकडे लक्ष्य असते. मुंबईमध्ये प्रतिष्ठा प्राप्त एम.आय.जी. क्रिकेट क्लबला उपांत्य फेरी गाठण्याची नामी संधी लाभली आहे.

त्यांनी न्यू इराला ४५.५ षटकात १८७ धावांवर रोखले. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल बिनबाद ८१ धावाही झटपट केल्या. त्यात अर्जुन दाणीने ५४ धावांचे योगदान दिले असून आपल्या संघाला पहिल्या डावातील महत्वाची आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.

एकीकडे तीन उपांत्यपूर्व लढतींमध्ये फलंदाजांना चांगले यश लाभत असता माहीम ज्युवेनाईल आणि स्टायलो क्रिकेटर्स या चौथ्या लढतीत मात्र धावांचा दुष्काळ पहावयास मिळाला.

तसे असले तरी दोन्ही संघांमध्ये पहिल्या डावातील आघाडीसाठी जबरदस्त रस्सीखेच पहावयास मिळाली. नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी पत्करणाऱ्या माहीम संघाला स्टायलोचा डावरा मध्यमगती गोलंदाज अरुण गुप्ता याने ३६ धावांत ५ बळी घेत ११७ धावांत गुंडाळले.

आदिल शेखने आपल्या ऑफ स्पिनवर २१ धावांत ३ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. मात्र यामुळे नाउमेद न होता महिमने स्टायलोला धक्के देत त्यांची अवस्था ६ बाद १०५ अशी केली.

आदिल शेख ३१ धावांवर खेळत असून स्टायलोची संपूर्ण मदार त्याच्यावरच आहे. त्याने ६ बाद ८९ कारून संघाला येथवर आणले आहे.

संक्षिप्त धावफलक : के.आर.पी. इलेव्हन- ७१ षटकात सर्वबाद ३०४ (आयुष जेठवा १६१, गौरव कुमार ५७, आदित्य जाधव ८३/३,हर्ष साळुंखे ४२/३, रोहित जोशी ५७/२) वि. शिवाजी पार्क जिमखाना बिनबाद ९ धावा.

दादर पारसी कॉलनी- ८० षटकात ९ बाद २४९ (आदित्य वारंग ४७,तन्मय भूरम ३१,रोनित ठाकूर खेळत आहे १०२, कारण सुरैया ३०, यश कृपाल ८८/४, आर्यन शेट्टी ७९/२,वरद शिंदे २५/२) वि. माझगाव सी.सी.

न्यू इरा ४५.५ षटकात सर्वबाद १८७ (अभिनव सिंघ ३९, मोहित तंवर २६, श्रेयस मांडलिक ४४, जय धात्रक ७४/३, झेद पाटणकर २१/२, जय जैन २८/२) वि. एम.आय.जी.सी.सी. बिनबाद ८१ (तेजस चव्हाण खेळत आहे २६, अर्जुन दानी खेळत आहे ५४)

माहीम ज्युवेनाईल्स ३०.४ षटकात सर्वबाद ११७ (वेदांत गढीया ४३, सूर्यांश शेडगे ४२, अरुण गुप्ता ३६/५, आदिल शेख २१/३) वि. स्टायलो क्रिकेटर्स ३९ षटकात ६ बाद १०६ (रोषण कनोजिया २१, आदिल शेख खेळत आहे ३१, मोईन खान १२/२, सूर्यांश शेडगे ४४/२)