संतोष कुमार घोष ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबई । स्पोर्टिंग युनियन क्लबच्या वतीने आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने खेळविण्यात येणाऱ्या ७व्या संतोष कुमार घोष ट्रोफी या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेला (१८ एप्रिल) आजपासून प्रारंभ होत आहे.

मुंबईतील १६ अव्वल क्लबचे संघ या स्पर्धेत सहभागी होत असून स्पर्धेला कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस फौंडेशन, श्रीमती हंसाबेन मेहता आणि खासदार गोपाळ शेट्टी यांचा पुरस्कार लाभला आहे.

छोट्या खेळाडूना दीर्घकाळ खेळपट्टीवर खेळण्याचा सराव व्हावा म्हणून स्पर्धेतील सामने दोन दिवसांचे खेळविण्यात येणार असून स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत.

एम.सी.ए.च्या नियमावली प्रमाणे हे सामने खेळविण्यात येणार असून विजेत्या संघाला संतोष कुमार घोष ट्रोफी तर उपविजेत्या संघाला कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस फौंडेशन ट्रोफी देवून गौरविण्यात येईल.

याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम गोलंदाज यांनाही संपूर्ण क्रिकेट कीट देवून गौरविण्यात येईल. प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूसही सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात येईल.

आझाद मैदान आणि क्रॉस मैदान येथे १८-१९ एप्रिलला प्राथमिक फेरीचे सामने खेळविण्यात येणार असून २३-२४ एप्रिलला उपांत्यपूर्व फेरीच्या लढती खेळविण्यात येतील.

उपांत्य फेरीच्या लढती २५-२६ एप्रिल रोजी मरीन ड्राईव्ह येथील पोलीस जिमखाना आणि इस्लाम जिमखाना येथे तर अंतिम फेरीची लढत २-३ मे रोजी पी.जे. हिंदू जिमखाना येथे खेळविण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी झालेले संघ – स्टायलो क्रिकेट क्लब, पय्याडे,माहीम ज्युवेनाईल,अवर्स क्रिकेट क्लब, एम.आय.जी. क्रिकेट क्लब, वेंगसरकर फौंडेशन,नवरोज क्रिकेट क्लब, न्यू ईरा स्पोर्टस क्लब,पोलीस जिमखाना, दादर पारसी कॉलनी, विजय सी.सी.,माझगाव क्रिकेट क्लब, स्पोर्टिंग युनियन क्लब, शिवाजी पार्क जिमखाना, युथ युनियन क्लब आणि के.आर.पी. इलेव्हन .