६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे

मुंबई । महाराष्ट्राची स्टार कबड्डीपटू सायली जाधव ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला संघाची बुधवारी घोषणा झाली.

ह्याच महिन्यात कऱ्हाड येथे झालेल्या स्पर्धेतून संभाव्य पुरुष आणि महिला संघातील २१ सदस्यांची निवड झाली होती. बुधवारी त्यातून अंतिम १५ खेळाडूंची निवड झाली. ६४वर्षांच्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पुरुष आणि महिला संघाचे नेतृत्व मुंबई उपनगराकडे आले आहे.

ही स्पर्धा भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने आणि तेलंगणा राज्य कबड्डी संघटनेच्या आयोजनाखाली होत आहे.६ दिवस चालणारी ही स्पर्धा परवा अर्थात ३१ डिसेंबर रोजी सुरु होणार असून ४ जानेवारी रोजी संपेल.

भारतीय कबड्डी असोशिएशनच्या संकेतस्थळानुसार या स्पर्धत पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागात सामने होणार असून एकूण एकूण ३१ संघ सहभागी होणार आहेत. ६ दिवस चालणारी ही स्पर्धा हैद्राबाद येथील गाचीबोवली इनडोअर स्टेडियमवर होणार आहे. 

सायली जाधव ही गोरगन येथे झालेल्या अशियन कबड्डी चॅम्पियन्सशिपमध्ये भारताच्या संघात निवड झालेली दुसरी महाराष्ट्राची खेळाडू होती. तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व अभिलाषा म्हात्रेने केले होते. परंतु तिच्याकडे आश्चर्यकारपणे ह्या स्पर्धेचे महाराष्ट्राचे नेतृत्व देण्यात आले नाही. कऱ्हाड येथील स्पर्धेत दोन्ही खेळाडू मुंबई उपनगराकडून खेळल्या होत्या.

६४व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ हे तिसऱ्या स्थानी राहिले होते. परंतु यावेळी संघात असणाऱ्या स्टार खेळाडूंच्या भरण्यामुळे विजेतेपदाची अपेक्षा चाहत्यांना नक्कीच असणार आहे.

महिला संघात पुण्याचे ३, मुंबई उपनगरचे ४ खेळाडू आहेत.

असा आहे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महिलांचा संघ: सायली जाधव(कर्णधार, मुंबई उपनगर), स्नेहल शिंदे, सायली केरिपाळे, आम्रपाली गलांडे (तिघी पुणे), अभिलाषा म्हात्रे, कोमल देवकर, तेजस्वी पाटेकर (तिघी मुंबई उपनगर), ललिता घरट (रत्नागिरी), सुवर्णा बारटक्के (मुंबई), पूजा पाटील (कोल्हापूर), पूजा पाटील (पालघर), शुभांगी वाबळे(अहमदनगर),

प्रशिक्षक: राजेश ढमढेरे(पुणे)
व्यवस्थापक: अंबादास गायकवाड(सोलापूर)