विश्वचषकात या भारतीय क्रिकेटपटूला गोलंदाजी करण्याची लसिथ मलिंगाला वाटते भीती

मुंबई। सोमवारी(15 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना पार पडला. या सामन्यात हार्दिक पंड्याने शेवटच्या काही चेंडूत केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने हा सामना 5 विकेट्सने जिंकत या मोसमातील पाचवा विजय मिळवला.

या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना मुंबई समोर 172 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिकने 16 चेंडूत नाबाद 37 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले.

तसेच शेवटच्या 2 षटकात मुंबई इंडियन्सला विजयासाठी 22 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिकने 19 व्या षटकातच पवन नेगीच्या गोलंदाजीवर 2 चौकार आणि 2 षटकारांची बरसात करत या 22 धावा पूर्ण केल्या आणि मुंबईला 6 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवून दिला.

मुंबईच्या या विजयात हार्दिकबरोबरच अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचाही मोठा वाटा होता. त्याने शेवटच्या काही षटकात गोलंदाजी करताना बेंगलोरच्या 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे सुरुवातीला चांगला खेळ करणाऱ्या बेंगलोरला 20 षटकात 7 बाद 171 धावाच करता आल्या. मलिंगाला त्याच्या या कामगिरीमुळे सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

पण सामन्यानंतर मलिंगाने MI TVशी बोलताना हार्दिकचे कौतुक केले आहे. तसेच श्रीलंका संघाचा कर्णधार असणाऱ्या मलिंगाने म्हटले आहे की विश्वचषकात त्याला हार्दिकला गोलंदाजी करायची भीती वाटते.

मलिंगा हार्दिकबद्दल म्हणाला, ‘तो खूप चांगला खेळला आणि मी सुद्धा त्याला गोलंदाजी करायला घाबरतो. जर मी त्याच्याविरुद्ध विश्वचषकात खेळलो, तर मी खरच त्याला गोलंदाजी करायला घाबरेल.’

30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात 6 जूलैला हेडिंग्ले, लीड्स येथे सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलच्या मध्यावर मुंबई इंडियन्सला बसला मोठा धक्का…

२०१९ विश्वचषकासाठी बांगलादेश संघाची घोषणा, एकही वनडे न खेळलेल्या खेळाडूला मिळाली संधी

हे चार गोलंदाज विश्वचषकासाठी भारतीय संघाला देणार नेटमध्ये सराव…