टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे दुसरे सत्र शानदार प्रारंभासाठी सज्ज

पुणे: भारताचा अव्वल मानांकित टेनिसपटू प्रजनेश गुन्नेश्वरण याला वाईल्ड कार्डद्वारे विशेष प्रवेश देण्यात आले असल्याचे टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या संयोजकांनी आज जाहीर केले. म्हाळुंगे बालेवाडी  क्रीडा संकुल येथे 31 डिसेंबर 2018 ते 5 जानेवारी 2019 या कालावधीत होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले कि, टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा ही आशियातील सर्वोत्तम एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धांपैकी एक असून अव्वल दर्जाचे खेळाडू, सर्वोत्तम सुविधा, आमच्या दृष्टीकोनाशी सहमत असणारे भागीदार आणि देशातील उभरत्या प्रजनेश गुन्नेश्वरणसारख्या गुणवान खेळाडूंना वाईल्ड कार्ड अशा सर्व माध्यमातून ही स्पर्धा सर्वोत्तम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्पर्धेचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर दाखविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले कि, या स्पर्धेतील गुंतवणूकदारांसाठी हि स्पर्धा अतिशय महत्वाची ठरणार असून एसएमजी अहवालानुसार गत मौसमातील टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला पारंपरिक माध्यमे तसेच सोशल मिडियावरील फॉलोअर्स आणि टेनिस चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे.

या अहवालानुसार एटीपी 250, एटीपी 500 आणि एटीपी 1000 दर्जाच्या सर्व स्पर्धांमध्ये टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला फेसबुकवर सर्वोत्तम प्रतिसाद मिळाला आहे. इतकेच नव्हे तर अन्य 15 एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धांच्या तुलनेत टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला 3,50,000 हुन अधिक चाहत्यांनी प्रतिसाद दिला असल्याचे अय्यर यांनी नमूद केले.

पीएमसीचे आयुक्त सौरभ राव म्हणाले कि, क्रीडा प्रेमी असल्याबद्दल प्रसिद्धी असलेल्या या शहरांतील टेनिस प्रेमींसाठी व चाहत्यांसाठी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा ही एक सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.

राव यांना अनुमोदन देताना पीसीएमसीचे आयुक्त श्रवण हार्डीकर म्हणाले कि, या स्पर्धेसाठी प्रजनेश गुन्नेश्वरण व रामकुमार रामनाथन यांना मुख्य फेरीसाठी वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले आहे तर, एस.के मुकुंद व साकेत मायनेनी यांना पात्रता फेरीसाठी वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले आहे. ज्याप्रकारे पुण्यातील या स्पर्धेसाठी जागतिक दर्जाच्या सर्वोत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळाडुंबरोबरच प्रेक्षकांना सुद्धा जगांतील सर्वोत्तम दर्जाच्या आंतरराष्ट्रीय अशा या स्पर्धेचा अनुभव घेता येणार आहे

प्रजनेशसाठी 2018 वर्षे यशदायी ठरले आहे. वर्षाच्या सुरुवातीला असलेल्या 243व्या क्रमांकावरून त्याने लक्षवेधी कामगिरी करत नोव्हेंबरमध्ये 104व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चीन आणि बंगळुरू येथे झालेल्या चॅलेंजर स्पर्धांमधील विजेतेपदामुळे त्यालाही हि प्रगती करता आली आहे. एका महिन्यापुर्वीच झालेल्या केपीआयटी एटीपी चॅलेंजर स्पर्धेतही त्याने उपविजेतेपद पटकावले होते. तसेच, आशियाई स्पर्धेतील कांस्य पदक हा त्याच्या शिरपेचातील आणखी एक तुरा ठरला.

सध्या जागतिक क्रमवारीत 110व्या स्थानावर असलेला प्रजनेश हा स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमधील पहिला खेळाडू ठरणार असून विश्वक्रमवारीतील अव्वल 50मधील पाच खेळाडू हे मुख्य ड्रॉमध्ये खेळत आहेत. या सर्व जागतिक दर्जाच्या खेळाडूंसाठी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा आगामी नव्या मौसमासाठी उत्तम सुरुवात व सराव ठरणार आहे. या खेळाडूंमध्ये गतविजेता व विश्व क्रमवारीत 30व्या क्रमांकाचा फ्रेंच खेळाडू सिमॉन जाईल्स तसेच, जागतिक क्र.6 खेळाडू केविन अँडरसन(दक्षिण अफ्रिका), जागतिक क्र. 7 खेळाडू  मेरिन चिलीच(क्रोएशिया), जागतिक क्र.25 खेळाडू हुयोन चूँग आणि जागतिक क्र. 45खेळाडू मालेक झाजेरी(ट्युनेशिया) या मातब्बर खेळाडूंचा समावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले.