दुसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात सर्वबाद ३३५ धावा

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने सर्वबाद ३३५ धावा केल्या आहेत. आज कर्णधार फाफ डू प्लेसिस ने अर्धशतक केले.

दक्षिण आफ्रिकेने आज ६ बाद २६९ धावांपासून खेळायला सुरवात केली. पण सुरवातीलाच शमीने केशव महाराजला १८ धावांवर बाद करून दक्षिण आफ्रिकेला ७ वा धक्का दिला.

त्यानंतर डू प्लेसिस आणि कागिसो रबाडाने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु इशांत शर्माने रबाडाला बाद करून ही जोडी फोडली. रबाडा नंतर लगेचच डू प्लेसिसला १४२ चेंडूत ६३ धावांवर असताना इशांत शर्माने त्रिफळाचित केले आणि त्याच्या पाठोपाठ मोर्ने मॉर्केललाही आर अश्विनने बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव संपुष्टात आणला.

तत्पूर्वी, काल एडन मार्करम(९४) आणि हाशिम अमलाने (८२) अर्धशतकी खेळी केली होती. भारताकडून या डावात आर अश्विन (४/११३), इशांत शर्मा(३/४६) आणि मोहम्मद शमी(१/५८) यांनी बळी घेतले.