दुसरी कसोटी: पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेच्या ६ बाद २६९ धावा

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २६९ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करम आणि हाशिम अमलाने अर्धशतके झळकावली. भारताकडून आर अश्विनने ३ बळी घेतले. 

सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार फाफ डू प्लेसिसने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाला योग्य ठरवत दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करम आणि डीन एल्गार या दोघांनी चांगली सुरुवात केली. या दोघांनी मिळून ८५ धावांची सलामी भागीदारी रचली.

सामन्याच्या पहिल्या सत्रात या दोघांनीही भारताच्या एकाही गोलंदाजाला यश मिळू दिले नव्हते. दुसऱ्या सत्रात मात्र आर अश्विनने एल्गारला ८३ चेंडूत ३१ धावांवर आणि मार्करमला १५० चेंडूत ९४ धावांवर बाद केले.

त्यानंतर आलेल्या हाशिम अमलाला एबी डिव्हिलियर्सने चांगली साथ दिली. या दोघांनीही ५१ धावांची अर्धशतकी भागीदारी केली होती. पण इशांत शर्माने या भागीदारीला जास्त रंगू न देता डिव्हिलियर्सला २० धावांवरच त्रिफळाचित केले.

डिव्हिलियर्स बाद झाल्यानंतर काही वेळातच अमलाला १५३ चेंडूत ८२ धावांवर असताना हार्दिक पंड्याने धावबाद केले . क्विंटॉन डिकॉक आणि व्हर्नोन फिलँडर या दोघांनाही विशेष काही करता आले नाही. हे दोघेही शून्य धावेवर बाद झाले. डिकॉकला अश्विनने बाद केले तर फिलँडर धावबाद झाला.

सध्या कर्णधार डू प्लेसिस २४ धावांवर आणि केशव महाराज १० धावांवर नाबाद खेळत आहेत.