फलंदाजी न करताही राहुल द्रविडने केले हे दोन मोठे विक्रम

आज न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची भारतीय संघाची हे सहावी वेळ आहे.

तसेच या संघाचा प्रशिक्षक असणारा राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली आहे. ‘द वॉल’ राहुल द्रविडने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे २०१५ मध्ये प्रशिक्षकपद स्वीकारले होते.

त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने बांग्लादेशमध्ये झालेल्या २०१६ च्या विश्वचषकातही अंतिम फेरी गाठली होती. परंतु त्यांना विंडीज संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात विंडीज संघाने भारतावर ५ विकेट्सने विजय मिळवला होता.

१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात अंतिम फेरीत संघाला दोन वेळा नेणारा द्रविड हा एकमेव प्रशिक्षक आहे. 

द्रविड भारत अ संघाचाही प्रशिक्षक आहे. द्रविडने या दोन संघाचे प्रशिकपद कायम राहण्यासाठी आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे मेंटॉरपदही सोडले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही संघांनी उत्तम कामगिरी केली आहे.

यावर्षी भारतीय संघाचा १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया संघाशी ३ फेब्रुवारीला सामना होणार आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रंगला होता या सामन्यात भारताने १०० धावांनी विजय मिळवला होता.

आत्तापर्यंत झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताने २०००,२००८ आणि २०१२ असे ३ वेळा विजेतेपद जिंकले आहे. आता यावर्षी पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चौथ्यांदा विजेतेपद मिळवतो का याची सर्वांना उत्सुकता आहे.