भारतीय संघाने केले जट्ट स्टाइल सेलिब्रेशन

कानपूरमध्ये अंतिम सामन्यात ६ धावांनी विजय मिळवत भारतीय क्रिकेट संघाने रविवारी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडवर २-१ असा मालिका विजय मिळवला आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या या मालिका विजयानंतर भारताने सलग ७ मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. पण ग्रीनपार्कमधील या सामन्यात न्यूझीलंडने यजमानांना चांगलेच रोखून धरले होते. विराट आणि रोहितच्या शतकांच्या जोरावर ३३७ धावांचा मोठा डोंगर उभारून सुद्धा सामन्यात एक क्षणी असे वाटत होते की न्यूझीलंड हा सामना सहज जिंकेल. भुवनेश्वर आणि बुमराच्या शेवटच्या षटकांतील उत्तम गोलंदाजीमुळेच भारत हा सामना जिंकू शकला.

स्वाभाविकच, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी रात्री सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. ज्यात संपूर्ण संघ शिखर धवन विजयी झाल्यावर जी स्टाइल करतो ती म्हणजेच जट्ट स्टाइल सेलिब्रेशन करताना दिसत आहे.

भारतीय संघात विजयी झाल्यावर किंवा शतकी खेळी खेळल्यावर खेळाडू वेगवेगळ्या प्रकारे आनंद साजरा करतात.

आता भारत १ नोव्हेंबर पासून न्यूझीलंड विरुद्ध ३ टी२० सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेतील पहिला सामना भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा कारकिर्दीतील अंतिम सामना असणार आहे. मालिकेतील बाकी दोन सामने ४ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला खेळले जातील.