सेहवागने युवराजला दिल्या नेहमीच्या हटके शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारताचा आक्रमक फलंदाज आणि २०११ विश्वचषक विजयाचा शिल्पकार युवराज सिंग आज त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त त्याला अनेक खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यात भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत संघ सहकारी युवराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सेहवागने ट्विटरवरून त्याचा आणि युवीचा फोटो पोस्ट करून लिहिले आहे की ” A B C D E F G H I J K L M N O P Q R S T W X Y Z ही अक्षरे तुम्हाला बऱ्याचदा आढळून येतील पण UV ही अक्षरे खूप दुर्मिळ आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा युवराज, तुझा लढा अनेकांना प्रेरित करो”

वीरेंद्र सेहवाग सध्या सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असतो आणि त्याच्या चाहत्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट करून आनंद देत असतो. त्यामुळे सेहवाग आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी सातत्याने प्रकाशझोतात कसे राहायचे हे त्याला चांगले ठाऊक आहे.

आज वाढदिवस असणाऱ्या युवराजची सध्या भारतीय संघात निवड झालेली नाही. तो ऑक्टोबर महिन्यात झालेल्या यो यो टेस्टमध्ये अपयशी झाला होता, त्यामुळे त्याने पंजाब संघाचे चार रणजी सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला. या वेळात त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले होते, त्यामुळे आता त्याने ही टेस्ट यशस्वी पार केली आहे.