हे मोठे कबड्डीपटू घेऊ शकतात फेडेरेशन कपमध्ये भाग

मुंबई । फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या फेडेरेशन कप स्पर्धेत प्रो कबड्डी तसेच राष्ट्रीय स्पर्धा गाजवलेले दिग्गज कबड्डीपटू आपल्याला खेळताना दिसू शकतात. त्यात महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगासह अनेक स्टार प्रो कबड्डीपटू भाग घेऊ शकतात.

ही स्पर्धा मुंबई उपनगर कबड्डी असोशिएशन आयोजित करत असून ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०१८ या काळात ही स्पर्धा होणार आहे. एसआरपीएफ क्रीडांगण, जयकोच, पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरी येथे ही स्पर्धा होणार आहे.

उपलब्ध माहितीप्रमाणे या स्पर्धेचे प्रथम १९८२ मध्ये प्रथम आयोजन झाले होते तर २०१७मध्ये इंदोर शहरात ही स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत खेळलेले महिला आणि पुरुष गटाचे संघ भाग घेणार आहे.

डिसेंबर-जानेवारीमध्ये हैद्राबाद येथे झालेल्या स्पर्धेत कर्नाटक, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, सेनादल आणि रेल्वे हे संघ पुरुषांच्या गटात उपांत्यपूर्व गेले होते.

त्यामुळे या संघातील मोठे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसू शकतात. महाराष्ट्राच्या संघाकडून या स्पर्धेत रिशांक देवाडिगा,,सचिन शिंगाडे, गिरीश इर्नाक,नितीन मदने, निलेश साळुंखे आणि ऋतुराज कोरवी हे खेळाडू स्पर्धेत खेळताना दिसतील. विशेष म्हणजे रिशांक देवाडिगा ज्या संघाकडून खेळतो तेच या स्पर्धेचे आयोजक असल्यामुळे त्याच्याकडून या स्पर्धेत मोठ्या अपेक्षा आहेत.

अन्य संघात कर्नाटकडून सुकेश हेगडे, शब्बीर बापू, जीवा कुमार हे खेळाडू तर उत्तराखंडकडून परदीप नरवाल आणि सुनील कुमार हे खेळाडू स्पर्धेत दिसू शकतात.

उत्तरप्रदेश संघातून राहुल चौधरी, हरियाणाकडून अनुप कुमार, मनजीत चिल्लर, संदीप नरवाल तर राजस्थानकडून दीपक हुडा, वझीर सिंग आणि सचिन तंवर हे खेळाडू भाग घेताना दिसू शकतात.

सेनादलकडून नितीन तोमर, सुरजीत सिंग, मोनू गोयात आणि अजय हे खेळाडू खेळताना दिसतील तर रेल्वेकडून मोहित चिल्लर, रोहित गुलिया, परवेश भैंसवाल आणि विकास खंडोला भाग घेऊ शकतात.

महिलांच्या गटात महाराष्ट्राच्या संघासह रेल्वे, उत्तर प्रदेश, पंजाब, छत्तीसगढ, हरियाणा, केरळ, हिमाचल प्रदेश हे संघ लक्ष आजमावताना दिसतील.