ब्रेकिंग: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत परदीप नरवाल खेळणार उत्तराखंडकडून

गतविजेत्या सेनादल संघाचा स्टार रेडर परदीप नरवाल ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये उत्तराखंडकडून खेळताना दिसेल.डुबकी किंग परदीप नरवालच्या कामगिरीच्या जोरावर गेल्यावेळी सेनादलचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत विजयी ठरला होता.

सेनादलकडून खेळताना ६४व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये २०वर्षीय नरवाल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. त्याने आपला हा फॉर्म प्रो कबड्डीमध्येही कायम ठेवत पाटणा संघाला विजय मिळवून दिला होता. याचमुळे त्याची गोरगन, इराण येथे झालेल्या आशियायी कबड्डी चॅम्पियनशिपसाठी संघात निवड झाली होती.

परदीप खेळत असलेल्या सेनादलमध्ये नितीन तोमर, सुरजीत आणि मोनू गोयत हे मोठे खेळाडू आहेत. परंतु परदीपचे एकहाती सामना जिंकून देण्याचे कौशल्य हे कायमच सेनादलसाठी मोठी गोष्ट राहिली आहे.

सेनादलला परदीपची कमी नक्कीच संपूर्ण स्पर्धेत जाणवणार आहे. त्यामुळे पुन्हा ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न आता नक्कीच पूर्वीएवढं सेनादलला सोपे नसणार.

परदीपच्या उत्तराखंड संघात प्रवेश करण्यामुळे मात्र तरुण खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाचा आत्मविश्वास नक्की वाढेल.