या कारणामुळे शाहिद आफ्रिदीने जिंकली भारतीयांची मने

पाकिस्तानचा अष्टपैलु खेळाडू शाहिद आफ्रिदीने सोशल मीडियावर भारतीयांची मने जिंकली आहेत. आफ्रिदीचा चाहता वर्ग मोठा आहे, त्यामुळे तो जिथे जाईल तिथे त्याला त्याचे चाहते भेटत असतात. असेच मागील दोन दिवस स्विझर्लंडमध्ये आईस क्रिकेट स्पर्धा चालू असताना आफ्रिदीने भारतीय चाहत्यांबरोबर आणि भारतीय तिरंग्याबरोबर फोटो काढून चाहत्यांना आनंद दिला आहे.

स्विझर्लंडमध्ये ८ आणि ९ फेब्रुवारीला आईस क्रिकेटचे सामने पार पडले. या स्पर्धेत भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा संघ डायमंड्स XI आणि आफ्रिदीचा रॉयल्स XI संघ आमने सामने आले होते. या दोन्ही सामन्यात रॉयल्स संघाने विजय मिळवले आहेत.

या स्पर्धेदरम्यान एक भारतीय चाहती भारताचा तिरंगा घेऊन उभी होती. तिने आफ्रिदीबरोबर फोटो काढण्यासाठी त्याला विनंती केली. त्याने ती विनंती मान्य केली.पण फोटो काढत असताना त्याने तिच्या हातातला घडी घातलेला तिरंगा पहिला आणि तिला सांगितले तो तिरंगा नीट धर. यानंतर आफ्रिदीने बाकी चाहत्यांबरोबरही फोटो काढले आहेत.

आफ्रिदीने भारतीय तिरंग्याबद्दल दाखवलेल्या आदराबद्दल सर्वांनी त्याचे कौतुक केले आहे. त्याला अनेक चांगल्या कॉमेंट्स आल्या आहेत .

 

या आईस क्रिकेटमध्ये विविध देशांच्या महान क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला आहे. यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड,दक्षिण आफ्रिका या देशांच्या खेळाडूंचा सहभाग आहे.

तसेच जॅक कॅलिस, डॅनियल व्हिटोरी, झहीर खान, लसिथ मलिंगा, माहेला जयवर्धने, वीरेंद्र सेहवाग,माईक हसी अशा मोठ्या खेळाडूंनीही यात सहभाग घेतला होता.