क्रिकेट इतिहासात केवळ दोन दिग्गजांनी केलेला विक्रम आता शाकिबच्या नावावर

बांगलादेश क्रिकेट संघाने गेल्या दहा वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे. 1986 मध्ये सुरू झालेला बांगलादेश संघाचा प्रवास नक्कीच वेग घेत आहे. बांगलादेश संघाच्या या वाटचालीत शाकिब अल हसनने मोठा वाटा ऊचलला आहे. गेल्या दहा वर्षांपासून शाकिब बांगलादेश संघाचा कणा बनला आहे.

नुकतेच बांगलादेश आणि अफगानिस्तान यांच्यात पार पडलेल्या टी-20 मालिकेत बांगालादेशला 3-0 असा पराभव स्विकारावा लागला असला तरी बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला.

शाकिब अल हसनने गुरूवारी अफगानिस्तान विरूद्ध झालेल्या सामन्यात नजिबुल्हा झारदान या फलंदाजाला बाद करत कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्हीं प्रकारच्या सामन्यात मिळून 500 वा बळी मिळवला.

तसेचं या 500 व्या बळीबरोबर त्याने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने आता जॅक कॅलिस आणि शाहिद आफ्रीदी यांच्यानंतर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये 10,000 धावा आणि 500 बळी मिळवण्याची किमया साधली आहे.

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने तिन्ही प्रकारात मिळून 25,653 धावा आणि 577 बळी मिळवले आहेत. तर पाकिस्तानच्या शाहिद आफ्रीदीने 11,196 धावा आणि 541 बळी मिळवले आहेत. शाकिबने 10,102 धावा आणि 500 बळींचा टप्पा नुकताच पार केला.

शाकिबने 2007 मध्ये भारताविरूद्ध क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. गेल्या अकरा वर्षात शाकिबने बांगलादेशची धूरा एकहाती वाहिली आहे. तसेच आयपीएलमध्ये खेळणारा पहिला बांगंलादेशी खेळाडू होण्याचा मान त्याने मिळवला आहे.