शाकिब अल हसनचा नवा विश्वविक्रम

बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने आयसीसीच्या तीनही क्रिकेटच्या क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या टी२० क्रमवारीत शाकिबने पुन्हा अष्टपैलू खेळाडूंमध्ये पहिले स्थान मिळवले आहे.

सध्या शाकिबच्या नावावर टी२० अष्टपैलू खेळाडूंमध्ये ३५३ गुण असून त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आहे. कसोटी क्रमवारीतही शाकिबच्या नावावर ४३१ गुण असून अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत त्याच्या पाठोपाठ भारताचा रवींद्र जडेजा आहे. जडेजाच्या नावावर सध्या ४२२ गुण आहेत.

एकदिवसीय अष्टपैलू क्रमवारीत नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जबदस्त कामगिरी करणारा मोहम्मद हाफिज दुसरा असून पहिल्या स्थानावर ३५३ गुणांसह शाकिब अल हसन आहे. हाफिज आणि शाकिबमध्ये जवळजवळ १५ गुणांचा फरक आहे.

विराट कोहली अव्वल:
टी२० प्रकारात फलंदाजीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली हा ७९९ गुणांसह पहिला असून भारताचा लोकेश राहुल १३व्या तर रोहित शर्मा १९व्या स्थानावर आहेत.

बुमराह गोलंदाजीमध्ये दुसरा:
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा टी२० मध्ये गोलंदाजी क्रमवारीत ७६४ गुणांसह दुसरा असून आर अश्विन १०व्या तर आशिष नेहरा १९व्या स्थानावर आहे.

युवराज अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ५वा
टी२० मध्ये युवराज सिंग आणि सुरेश रैना हे दोन भारतीय अष्टपैलू क्रमवारीत अनुक्रमे ५वे आणि ९वे आहेत. जिथे भारतीय अष्टपैलू अश्विन आणि जडेजा हे पहिल्या २० अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्थान राखू शकले नाहीत तिथे आश्चर्यकारकपणे भारतीय कर्णधार विराट कोहली या यादीत १७व्या स्थानी आहे.