शेन वॉर्नचे राजस्थान रॉयल्समध्ये पुनरागमन

आयपीएलच्या ११ वा मोसमात राजस्थान रॉयल्स संघाचा माजी कर्णधार शेन वॉर्नचे पुन्हा एकदा राजस्थान संघात पुनरागमन झाले आहे. तो या वर्षीच्या आयपीएल मोसमात राजस्थान रॉयल्स संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहे.

पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सशी जोडले जाणे हे खूप आनंद देणारे आहे असे सांगताना वॉर्न म्हणाला, ” माझ्या क्रिकेट कारकिर्दीत राजस्थान रॉयल्ससाठी खूप
खास जागा आहे. मला राजस्थान रॉयल्सच्या फ्रॅन्चायझींकडून आणि चाहत्यांकडून जे प्रेम मिळाले आहे त्याबद्दल मला फार आनंद आहे. आमच्याकडे तगडा, तरुण आणि ऊर्जेने भरलेल्या खेळाडूंचा संघ आहे. आता मी त्यांच्याबरोबर काम करणार आहे.”

वॉर्न मार्गदर्शक म्हणून काम करणार असल्याबद्दल राजस्थान रॉयल्सने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पहिला रॉयल संघात परत येत आहे. तो पहिला कर्णधार, मग प्रशिक्षक आणि आता मार्गदर्शक म्हणून संघात असेल. वॉर्न तुझे स्वागत आहे.” तसेच राजस्थान रॉयल्स संघाने ट्विटरवरून एक व्हिडीओदेखील शेयर केला आहे.

यावर वॉर्ननेही ट्विट केले आहे. तो म्हणाला, ” मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मला या मोसमात संघाचा मार्गदर्शक असण्याचा आनंद आहे.”

वॉर्नच्या संघात परत येण्याबद्दल राजस्थान रॉयल्स संघाचे संघमालक मनोज बादल म्हणाले, “वॉर्नला संघात परत आणणे हे कठीण काळातही आमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या चाहत्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे .”

राजस्थान संघाशी वॉर्न जोडला जाणार असल्याचे तर्क मागील आठवड्यात वॉर्नने केलेल्या ट्विटवरूनच लावण्यात आले होते. त्याने ट्विट केले होते की, “तुमच्याकडून या आठवड्यात होणाऱ्या घोषणेची मी वाट बघत आहे. मी यासाठी खूप उत्साही आहे आणि हो हे आयपीएल २०१८ विषयी आहे.”

राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्याच मोसमात(२००८) वॉर्नच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले होते. वॉर्न आयपीएलमध्ये २०११ ला शेवटचा सामना खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ५५ सामन्यात ५७ विकेट्स घेतल्या आहेत.

वॉर्न हा ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज असून त्याच्या नावावर १४५ कसोटी सामन्यात २५.४२ च्या सरासरीने ७०८ विकेट्स आहेत. तसेच तो कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. याबरोबरच वॉर्नने १९४ वनडे सामन्यात २५.७४ च्या सरासरीने २९३ विकेट्स घेतल्या आहेत.