अँडी मरे – टेनिसचा शापित शिलेदार

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund)

काल अँडी मरे ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाला. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत अतिशय भावुक होत अँडीने ही स्पर्धा कदाचित आपली शेवटची स्पर्धा असू शकेल असे सांगितले होते. या वक्तव्यामुळे त्याच्या सामन्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले होते. स्पेनच्या रॉबर्टो बॅटीस्टा अगूतने पहिले दोन सेट जिंकून जोरदार सुरुवात केली. पुढच्या दोन सेटमध्ये अँडीने जोरदार पुनरागमन करत हे सेट आपल्या नावावर केले. अँडीने तिसरा सेट जिंकत सामना वाचवला त्यावेळी त्याने केलेला जल्लोष पाहण्याजोगा होता. एरवी तशी शांत असणारी त्याची आई ज्युडीदेखील आपला आनंद लपवू शकली नाही. आपल्या जागेवर उभे रहात तिने अँडीला प्रोत्साहन दिले. सबंध स्टेडियमने उभे रहात अँडीला मानवंदना दिली. याचवेळी ट्विटरवर अनेक नावाजलेले क्रीडा पत्रकार अँडीच्या सामन्याबद्दल ट्विट करत होते. तिसरा आणि चौथा सेट जिंकताना अँडीने आपल्या शरीरातली सगळी ऊर्जा पणाला लावली. त्याचाच परिणाम त्याच्या पाचव्या सेटमधील खेळावर झाला. हा सेट अँडी ६-२ असा हरला आणि यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील त्याचा प्रवास पहिल्याच फेरीत संपला.

अँडी तसा गुणवंत खेळाडू. याच गुणवत्तेमुळे गेल्या दहा वर्षांत अँडीने ११ वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी तर १० वेळा उपांत्य फेरी गाठली. मात्र त्याचे नशीब वाईट म्हणा किंवा अजून काही.
या २१ पैकी १८ वेळेस त्याचा प्रतिस्पर्धी फेडरर, जोकोविच किंवा नदाल यांच्यापैकी कुणीतरी एक होता. हे तिघेही आपापल्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम कालावधीत होते. त्यामुळे ग्रँडस्लॅमच्या अकरा अंतिम सामन्यांपैकी केवळ तीनदा अँडी विजेता ठरला. त्याने २०१६ च्या एटीपी टूरचे विजेतेपद मिळवले. तिथेही त्याचा प्रतिस्पर्धी जोकोविच होता. सलग दोन ऑलिंपिकमध्ये टेनिसच्या एकेरीचे सुवर्णपदक मिळवण्याचा अनोखा विक्रमही अँडीच्या नावावर आहे.

अँडीकडे पाहिले की मला राहूनराहून अमोल मुजुमदारची आठवण होते. सचिन,द्रविड, गांगुली,लक्ष्मण यांच्यासमोर देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने धावा करूनही त्याला भारतीय संघात कधीच संधी मिळू शकली नाही. अँडीला संधी भरपूर मिळाली. कारण टेनिस हा वैयक्तिक खेळ आहे. मात्र फेडरर, जोकोविच, नदाल या त्रयीबरोबर खेळताना त्याला म्हणावी तेवढी विजेतेपदं मिळवता आली नाहीत. अँडीच्या दुर्दैवाने या जगात आकडेवारीला अनन्यसाधारण महत्व आहे. अँडीची गुणवत्ता आकडेवारीतून दिसत नसल्याने अनेकांना ती उमजतंही नाही.

अँडीच्या कारकिर्दीचा बराच काळ एका विशिष्ट दुखापतीची काळजी घेण्यात गेला. त्याच्या गुडघ्याच्या वाटीचे हाड दोन भागांत विभागलेले आहे. हे त्याला उमजायला वयाचे सोळावे वर्ष उजाडावे लागले. अर्थातच या विचित्र दुखापतीमुळे त्याला पुढे खेळताना त्रास होई. अनेकदा त्याने या कारणासाठी सामन्यांतून माघारही घेतली. अलीकडे त्याला हिप बोन म्हणजेच खुब्याच्या हाडाच्या दुखपतीने देखील बराच त्रास दिला. अखेरीस दुखापतीच्या या त्रासाला कंटाळून अँडीने निवृत्तीची घोषणा केली आहे. कालच्या पराभवानंतर अँडीने, “मी कदाचित अजूनही खेळू शकेल आणि त्यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न मी करेल.” असे वक्तव्य केले. पुन्हा एकदा पहिल्यासारखे खेळण्यासाठी त्याला एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज आहे. सध्याची परिस्थिती पाहता अँडी कदाचित या वर्षीची विंबल्डन स्पर्धा खेळून निवृत्त होईल असा अंदाज आहे.

अँडी निवृत्त झाला तरी त्याचा बेसलाईनवरचा खेळ, डबल हँडेड बॅकहँड आणि चपखल लॉब्स चाहत्यांच्या लक्षात राहतील. फेडरर, नदाल, जोकोविचचा युगात खेळलेला टेनिसचा शापित शिलेदार म्हणून अँडीला टेनिसचे चाहते कायम लक्षात ठेवतील.