हरभजन सिंगचा शार्दूल ठाकूरच्या जर्सी क्रमांक १० घालण्याला पाठिंबा

गेले दोन-तीन दिवस जर्सी क्रमांक १० घातल्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जाणाऱ्या वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरच्या मदतीला शेवटी सचिनचा एक मोठा चाहता आणि भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आला आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये हरभजन सिंगने शार्दूलच्या या कृतीचे समर्थन केले आहे. हरभजन म्हणतो, ” मला शार्दूल ठाकूरचे वाईट वाटते. ह्या क्रमांकाची जर्सी घालणे यात त्याचा दोष काय? तो सचिनला क्रिकेट खेळताना पाहत मोठा झाल्यामुळे तो ही जर्सी घालत असेल आणि त्याचेही स्वप्न असेल देशासाठी क्रिकेट खेळण्याचे. त्यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली आहे. एखाद्यावेळी १० त्याचा आवडता क्रमांक असेल किंवा त्याला एकप्रकारे सचिनला मानवंदना द्यायची असेल. “

” प्रत्येकाची आपली एक भावना असते. आम्ही सचिनचा आदर करतो. जेव्हा सचिन खेळत असे तेव्हा कुणीही त्या क्रमांकाची जर्सी घातली नाही. दुसऱ्या कुणी तीच जर्सी वापरली म्हणून सचिन बद्दलचा आदर कमी होतो असे नाही. हा पूर्णपणे भारतीय क्रिकेट बोर्डाचा निर्णय असेल की ती जर्सी निवृत्त करावी की वापरात ठेवावी. जर तुम्ही सचिनला हे विचारला तर त्यालाही याबद्दल अडचण नसेल. “ असेही हरभजन सिंग पुढे म्हणाला.