ह्या प्रतिभावान खेळाडूचे आज आंतरराष्ट्रीय पदार्पण !

कोलंबो. श्रीलंका । श्रीलंकेविरुद्ध आज वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर पदार्पण करू शकतो. काल शार्दूलला पत्रकारांना संबोधित करायला पाठवून कर्णधार विराट कोहलीने याचे एकप्रकारे स्पष्ट संकेत दिले आहेत. या वनडे सामन्याच्या पूर्वसंधेला पत्रकारांशी संवाद साधताना शार्दूलने आपल्या कारकिर्दीविषयी गप्पा मारल्या.

२०१६ सालापासून शार्दूल भारतीय संघाबरॊबर आहे. परंतु अंतिम ११ जणांत शार्दूलला अजूनपर्यंत संधी मिळालेली नाही. श्रीलंका दौऱ्यापूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यावर तसेच भारतात झालेल्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली होती.

आयपीएल १० मध्ये शार्दूल राइजिंग पुणे सुपरजायंट संघाचा भाग होता. यात त्याने २८.६३च्या सरासरीने १२ सामन्यात ११ बळी घेतले आहेत. उमेश यादव आणि मोहम्मद शमीला विश्रांती देऊन या प्रतिभावान खेळाडूला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

हा मुंबईकर खेळाडू नोव्हेंबर २०१२ पासून मुंबई रणजी संघाचा सदस्य आहे. तब्बल ४९ प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या २५ वर्षीय शार्दूलने प्रथम श्रेणीमध्ये १६९ बळी घेतले आहे.

भारताकडून २०१७मध्ये वनडेमध्ये केवळ कुलदीप यादव या खेळाडूने पदार्पण केले असून त्याचा वनडे कॅप नंबर आहे २१७. जर शार्दूल ठाकूरला आज संधी मिळाली तर तो भारताकडून वनडे सामने खेळणारा २१८ खेळाडू ठरणार आहे.