शिखर धवन, रवी शास्त्री घेतले पद्मनाभस्वामींचे दर्शन

तिरुवनंतपुरम । भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सलामीवीर शिखर धवन यांनी येथील पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना आज येथे संध्याकाळी ७ वाजता होणार असून सामन्याच्या पूर्वसंधेला अर्थात काल या दोघांनी येथील मंदिरात येऊन दर्शन घेतले.

शास्त्री आणि धवन यांनी काल सकाळी येथे पवित्र स्नान करत मंदिरात देवाची विधिवत पूजाही केली. त्यांनंतर पुन्हा ते हॉटेलला परतून संघासहकाऱ्यांबरोबर सरावाला हजर झाले.

हा सामना पावसामुळे रद्द होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. गेले ५-६ दिवस शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याकारणाने क्रिकेटप्रेमींना आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रत्यक्ष खेळताना पाहायची संधी मिळणे थोडे अवघड झाले आहे.

भारत वि. न्यूझीलंड मालिका १-१ अशी बरोबरीत असून हा सामना त्याअर्थाने निर्णायक सामना आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतही शेवटच्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. तेव्हा भारतीय संघाने मैदानात फुटबॉल खेळून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.