पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर

बेंगलोर। सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज (२३ सप्टेंबर) मुंबई विरुद्ध रेल्वेचा सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ४०० धावा केल्या आहेत. याबरोबरच अनेक विक्रमही केले आहेत.

मुंबईकडून पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यरने आक्रमक खेळ करत शतके केली आहेत. त्यांच्या या शतकाच्या जोरावरच मुंबईने ४०० धावांचा टप्पा गाठला आहे.

या सामन्यात मुंबईने सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेची विकेट गमावली होती. पण त्याचा परिणाम सलामीवीर फलंदाज पृथ्वी आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला श्रेयसने त्यांच्या खेळावर होऊ दिला नाही.

त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६१ धावांची दिडशतकी भागीदारी रचली. पण ही जोडी फोडण्यात अवस्थी या रेल्वेच्या गोलंदाजाला यश आले. त्याने पृथ्वीला ८१ चेंडूत १२९ धावांवर खेळत असताना बाद केले. या खेळीत पृथ्वीने १४ चौकार आणि ६ षटकार मारले.

पृथ्वी बाद झाल्यानंतरही सुर्यकुमार यादवने श्रेयशला भक्कम साथ देत तिसऱ्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी रंगत असतानाच यादव अर्धशतक करुन बाद झाला. त्यासा एसीपी मिश्राने बाद केले.

यादवने ५५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६७ धावा केल्या. तो बाद झाल्यावर काही वेळातच श्रेयसही बाद झाला. त्याने ११८ चेंडूत १४४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १८ षटकार मारले. श्रेयसला ४५ व्या षटकात अनुरित सिंगने बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर अनुरितने शिवम दुबेलाही शून्य धावेवर बाद केले.

यानंतर सिद्धेश लाड आणि अदित्य तरेने विकेट न गमावता नाबाद ४४ धावांची भागीदारी रचत मुंबईला ५० षटकात ४०० धावांचा टप्पा पार करुन दिला.

मुंबईने रचले हे विक्रम-

-अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात भारतात ४०० धावा करणारा मुंबई दुसरा संघ. याआधी मध्यप्रदेशने २०१० मध्ये रेल्वेविरुद्धच ४१२ धावा केल्या होत्या.

-भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अ दर्जाच्या क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या. मध्यप्रदेश ४१२ धावांसह अव्वल.

-पृथ्वी शॉने या सामन्यात ६१ चेंडूत शतक करत मुंबईकडून अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. याआधी महाराष्ट्राविरुद्ध १९९६ ला राजेश सुतारने ६१ चेंडूत शतक केले होते.

महत्वाच्या बातम्या-

रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जगातील सर्वात विध्वंसक जोडी

  -एशिया कप २०१८: टीम इंडियासमोर अनपेक्षित पाकिस्तानचे कडवे आव्हान

-भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या या खेळाडूला आयसीसीने सुनावली ही मोठी शिक्षा