या चेहऱ्यामागे नक्की दडलंय कोण?

तो आला, त्याने पहिले आणि तो जिंकला असं काहीस नेहमी एखाद्या खेळाडूबद्दल किंवा संघाबद्दल बोललं जात. परंतु प्रो-कबड्डीच्या मोसमात असा एक खास मित्र आहे ज्याची चर्चा सामना संपल्यावरवही कबड्डीप्रेमी करत राहतात.

अगदी लहान मुलांपासून ते जयपूर पिंक पॅन्थर संघाचा मालक अभिषेक बच्चनपर्यंत सर्वांची वाहवाह मिळवणारा मॅस्कॉट (शुभंकर) शेरू हा सर्वांचा चर्चेचा विषय असतो. आजपर्यंत अनेक स्पर्धांसाठी अनेक वेगवेगळे मॅस्कॉट आपण पहिले असतील परंतु पुणेरी पलटणचा शेरू मॅस्कॉट काही खास.

जबरदस्त डान्सच कौशल्य तसेच योग्यवेळी प्रसंगावधान राखून हावभाव करण्याची कला, कधी रेडींगमध्ये आपल्या संघातील खेळाडूची पकड झाली म्हणून भावनिक होणारा तर संघातील खेळाडूने सुपर रेड केली म्हणून आनंदाने नाचणारा हा शेरू प्रेक्षक सामना संपल्यावर घरी जातानाही विसरत नाही.

अशा या शेरुच्या चेहऱ्यामागे नक्की कोणता खरा चेहरा दडलाय? कोण असेल ही व्यक्ती? काय असेल त्याच वय? काय करत असेल मोकळ्या वेळात हा शेरू? असे अनेक प्रश्न सहाजिकच कोणत्याही कबड्डीप्रेमीला पडलेच असणार. म्हणूनच या शेरूशी महा स्पोर्ट्सने आज पुणे लेगमध्ये खास संवाद साधला आणि मैदानावरील आणि मैदनाबाहेरील शेरू यात किती फरक आहे याचा चटकन अंदाज आला.

मुंबईतील ठाणे येथून आलेला २० वर्षीय विवेक वीरेंद्र गायकवाड हा यापाठीमागील चेहरा. अतिशय होतकरू परंतु तेवढाच प्रतिभावान असणारा विवेक २०१६ या वर्षी अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड हिपॉप स्पर्धेसाठी १३.१३ ग्रुपकडून गेला होता. ३ आठवडे चाललेल्या या स्पर्धेसाठी त्याचा अंदाजे ३ लाख रुपये खर्च झाला.

विवेकने या स्पर्धेसाठी जावे म्हणून आईवडिलांनी नातेवाईक तसेच इतर ठिकाणहून ३ लाखांचे कर्ज काढले होते. त्या स्पर्धेतून विवेकला विशेष काही अर्थाजन झाले नाही परंतु झालेले कर्ज फेडण्यासाठी काहीतरी हालचाल करावी म्हणून आपला मित्र अंकित याला त्याने डान्सशी संबंधित काहीतरी काम असेल तर विचारले.

अंकित स्टार मध्ये कामाला असल्यामुळे त्याने प्रो कबड्डीमधील सामन्यादरम्यान जो वेळ असतो त्या वेळात फ्रीस्टाईल डान्सरची गरज असल्याचे विवेकला सांगितले. परंतु पुढे जाऊन हा डान्स आपल्याला तब्बल १० किलोचे मॅस्कॉटचे कपडे घालून करायचंय हे ऐकल्यावर विवेकला मोठे टेन्शन आले. तरीही त्याने २-३ दिवस गुगलला आपला गुरु मानून इंटरनेटवरून जगातील विविध मॅस्कॉटचा चांगलाच अभ्यास केला आणि सुरु झाला हा ३ महिन्यांचा प्रवास.

या ३ महिन्यात प्रो-कबड्डीचा मुक्काम तब्बल १२ शहरात राहिला असून प्रत्येक शहरात विवेक तेथील संघाच्या सामन्यादरम्यान तिथला वेष परिधान करून आलेला आहे. एक सामना अंदाजे एक ते दीड तास चालतो. एवढा वेळ १० किलो वजनाचे हे कपडे घालून विवेक पुरता ओलाचिंब झालेला असतो. असे असतानाही संपूर्ण मैदानात कुठेही जाण्याची परवानगी असलेला विवेक लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करत असतो.

त्याच्याकडे असलेल्या ह्याच कौशल्यांमुळे बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चननेही त्याचे जोरदार कौतुक केले आहे. एवढे सगळे असून आपल्या कामाशी काम ठेवणाऱ्या विवेकची खेळाडूंशी विशेष ओळख नाही. ब्रेक टाइममध्ये लोकांना कंटाळा नाही येणार म्हणून सतत काहीतरी नवे करणारा विवेक म्हणतो, ” ब्रेकच्या वेळात माझ्यावर खूप प्रेशर असते. काहीतरी नवीन करून दाखवायचे असते. ज्यातून कबड्डीप्रेमींचे मनोरंजन होईल.”

अर्थार्जनाबद्दल विचारले असता विवेक म्हणाला,” माझ्या आई-बाबांवर माझ्यामुळे खूप कर्ज झाले. ते मला वाटते मीच फेडावे. म्हणून मी हे काम करायला सुरुवात केली. आता बऱ्यापैकी कर्ज फिटले आहे. मला डान्स करायला आवडतो. त्यातूनच मी डान्स करणारा पहिला मॅस्कॉटची भारताला ओळख करून दिली आहे. “

विवेकाच्या बोलण्यात तथ्यही आहे. कारण आजपर्यंत आपण मॅस्कॉट हे बऱ्यापैकी शोभेची बाहुली म्हणूनच क्रीडास्पर्धांना पहिले आहे. खऱ्या अर्थाने एक ऍक्टिव्ह मॅस्कॉट म्हणून विवेकची ओळख म्हणूनच कायम राहील. Sheru of Puneri Paltan अशा नावाने फेसबुकवर एक खास पेजही आहे. यावरून तो किती प्रसिद्ध आहे याचा अंदाज येतो.

खेळ वाढला आणि त्याचे योग्य प्रकारे नियोजन केले तर किती वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार निर्माण होऊ शकतात याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे विवेक आहे. जसे क्रिकेट-कबड्डी खेळ वाढले तसेच अन्य खेळही मोठे होवो आणि विवेक सारख्या वेगवेगळ्या प्रतिभा असणारे तरुण यातून पुढे येवो हीच अपेक्षा.