शिखर धवनने विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर दिला भावनिक संदेश, पहा व्हिडिओ

भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला 9 जूनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते. त्याची ही अंगठ्याची दुखापत वेळेत बरी होणार नसल्याने त्याला या महत्त्वाच्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर शिखरने एक भावनिक संदेश देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की ‘मी 2019 विश्वचषकाचा पुढे भाग असणार नाही हे सांगताना मला खूप भावनिक वाटत आहे. दुर्दैवाने माझा अंगठा वेळेत बरा होणार नाही. पण शो मस्ट गो ऑन(स्पर्धा पुढे कायम राहिली पाहिजे). मी माझ्या संघसहकाऱ्यांनी, क्रिकेट चाहत्यांनी आणि आपल्या संपूर्ण देशाने दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्या बद्दल कृतज्ञ आहे. जय हिंद!’

त्याचबरोबर शिखर या व्हिडिओमध्ये म्हटला आहे की ‘दुर्दैवाने माझा अंगठा वेळेत बरा होणार नाही. खरचं मला विश्वचषकात खेळायचे होते आणि माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे होते. पण आता परत जाऊन यातून बरा होण्याची आणि पुढील खेळासाठी तयार होण्याची वेळ आली आहे.’

‘मला खात्री आहे संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे आणि ते विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करतील. आमच्यासाठी प्रर्थना करत रहा आणि पाठिंबा देत रहा. तूमचा पाठिंबा आणि प्रार्थना आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि जवळच्या आहेत. तूम्ही दिलेल्या संपूर्ण प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी पून्हा एकदा आभार.’

शिखर या स्पर्धेतून बाहेर पडण्याची घोषणा आज(19 जून) भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमनियम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

त्यांनी यावेळी सांगितले की ‘शिखरच्या दुखापतीबद्दल अनेक तज्ञांची मते विचारात घेतली आहेत. तो मध्य जूलैपर्यंत बरा होणे कठीण आहे. त्यामुळे त्याला या विश्वचषकातून बाहेर पडावे लागत आहे. धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या खाली फ्रॅक्चर आहे.’

त्याचबरोबर त्यांनी युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला शिखरचा बदली खेळाडू म्हणून संघात घेण्यासाठी आय़सीसीकडे विनंती केली असल्याचेही सांगितले आहे.

9 जूनला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज पॅट कमिंन्सने टाकलेला एक चेंडू शिखरच्या अंगठ्याला लागला होता.या सामन्यानंतर करण्यात आलेल्या स्कॅननंतर त्याला फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे बीसीसीआयने शिखरला मेडीकल टीमच्या निरिक्षणाखाली ठेवले होते आणि पंतला राखीव खेळाडू म्हणून इंग्लंडला बोलावून घेतले होते. मात्र अखेर या दुखापतीमुळे शिखरला स्पर्धेतूनच बाहेर पडावे लागले आहे.

शिखरने या विश्वचषकात दोन सामने खेळले आहेत. यात त्याने 125 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंगठ्याला चेंडू लागल्यानंतरही फलंदाजी करत 117 धावांची शतकी खेळी केली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या कारणामुळे शिखर धवन विश्वचषक २०१९मधून पडला बाहेर

पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले असे गमतीशीर उत्तर, पहा व्हिडिओ

विराट कोहलीचा हा खास फोटो होतोय जोरदार व्हायरल