शिखर धवनच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयचा मोठा खूलासा

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 विश्वचषकात भारताने आत्तापर्यंत केवळ 2 सामने खेळले आहेत. अशातच भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला अंगठ्याचे फ्रॅक्चर झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

काही वृत्तांनुसार या दुखापतीमुळे त्याला 3 आठवड्यांसाठी या विश्वचषकातून बाहेर बसावे लागणार आहे. त्याला  रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज पॅट कमिंन्सने टाकलेला एक चेंडू अंगठ्याला लागला होता. त्याच्यावर लगेचच भारताचे फिजिओ पॅट्रिक फऱ्हाट यांनी उपचार केले होते.

परंतू नंतर करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये शिखरच्या डाव्या अंगठ्याला फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या या दुखापतीबद्दल बीसीसीआयने मंगळवारी ट्विटरवरुन माहिती दिली आहे की शिखर संघाबरोबर इंग्लंडमध्ये कायम रहाणार असून संघाच्या मेडिकल टीमच्या निरिक्षणाखाली राहील.

बीसीसीआयने ट्विट केले आहे की ‘भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन सध्या बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या निरिक्षणाखाली आहे. संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे की शिखर इंग्लंडमध्येच राहिल आणि त्याच्या दुखापतीची प्रगतीवरही लक्ष ठेवले जाईल.’

असे असले तरी धवन किती दिवसांसाठी बाहेर गेला आहे, याबद्दल मात्र बीसीसीआयने अजून कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. त्याचबरोबर बीसीसीआयने त्याच्याऐवजी बदली खेळाडू घेतला जाणार की नाही याबद्दलही कोणती माहिती दिलेली नाही.

शिखरने रविवारी दुखापतीनंतरही ऑस्ट्रेलिया विरुद्ध 109 चेंडूत 117 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच त्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता. पण तो या सामन्यात नंतर क्षेत्ररक्षणासाठी उतरला नव्हता. त्याच्याऐवजी पूर्ण 50 षटकात रविंद्र जडेजाने राखीव क्षेत्ररक्षक म्हणून क्षेत्ररक्षण केले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले…

विश्वचषक २०१९: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का

या पाच खेळाडूंपैकी एकाला मिळू शकते शिखर धवन ऐवजी टीम इंडियात संधी