उद्या शिखर धवनही होणार शतकवीर

भारताचा स्फोटक सलामीवीर शिखर धवनला वनडे कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा गाठण्याची उद्या संधी आहे. उद्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात ६ सामन्यांच्या वनडे मालिकेतील चौथा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना शिखर धवनच्या वनडे कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे.

शिखरने आत्तापर्यंत ९९ वनडे सामने खेळले आहेत. या ९९ वनडे सामन्यात शिखरने ४५.६५ च्या सरासरीने ४२०० धावा केल्या आहेत. यात त्याच्या १२ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे. शिखरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणममध्ये २० ऑक्टोबर २०१० ला वनडे पदार्पण केले होते. या सामन्यात त्याला क्लिंट मॅकेने शून्य धावेवर बाद केले होते.

शिखर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात सलग अर्धशतकी खेळी केली आहे. या दोन्ही सामन्यात त्याने कर्णधार विराट कोहलीबरोबर महत्वाची भागीदारी केली. त्यामुळे त्याच्या उद्याच्या १०० व्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या खेळीची चाहत्यांना अपेक्षा असणार.