शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा पहिल्या दिवशीचा निकाल

संघर्ष, होतकरू,होतकरू या परजिल्ह्यातील संघाबरोबर अमरहिंद, शिवशक्ती या स्थानिक महिला संघांनी शिवाई प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेच्या महिलांत विजयी सलामी दिली. पुरुषांत जॉली, शाहू सडोली, गोलफादेवी, अमर, अंकुर यांची आगेकूच. मुंबईतील ना म जोशी मार्ग येथील श्रमिख जिमखाना येथे आज पासून सुरू झालेल्या महिलांच्या उदघाटनिय सामन्यात उपनगरच्या संघर्षने अ गटात नाशिकच्या एस पी. चा ४६-२१असा धुव्वा उडविला.

पहिल्या डावात २१-०९अशी आघाडी घेणाऱ्या संघर्षने दुसऱ्या डावातही तोच जोश कायम राखत हा सामना सहज आपल्या नावे केला. कोमल देवकर, कोमल यादव यांच्या चढाया, तर पूजा जाधव, अश्विनी पाटेकर यांचा भक्कम बचाव या विजयात महत्वाचा ठरला. योगिता धोत्रे, अपेक्षा मोहिते नाशिककडून छान खेळल्या.

या सामन्यात चमकदार विजय मिळविणाऱ्या संघर्षाला पुढच्या सामन्यात मात्र पराभवाची चव चाखावी लागली. मुंबईच्या शिवशक्तीने त्यांना ३३-२६ असे नमविलें.मध्यांतराला २३-१०अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने नंतर मात्र सावध खेळ करीत हा विजय साकारला. अपेक्षा टाकळे, पूजा यादव, रेखा सावंत, पौर्णिमा जेधे यांच्या पल्लेदार चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. कोमल देवकर, दीपा बर्डे यांना उत्तरार्धात सूर सापडला, पण तोपर्यंत सामना हातातून निसटला होता.

ठाण्याच्या होतकरूने क गटात मुंबई पोलिसांना २४-२३असे चकवित आगेकूच केली. मध्यांतराला १०-१३ अशा पिछाडीवर पडलेल्या होतकरूने चैताली बोऱ्हाडे, प्राजक्ता पुजारी, राजश्री ढेले यांच्या जोशपूर्ण खेळाने हा विजय खेचून आणला. पोलिसांच्या सोनल धुमाळ, शीतल बावडेकर यांना उत्तरार्धात सहकाऱ्यांनी योग्य ती साथ न दिल्याने हा निसटता पराभव पत्करावा लागला.

ब गटात महात्मा गांधीने डॉ. शिरोडकरला ५०-१७असे धुवून काढले. पूजा केणी, शीतल जाधव, तेजस्वी पाटेकर, रुपाली जाधव या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. एकेकाळचा हा बलाढ्य संघ आज मात्र अगदीच दुबळा वाटला. शिरोडकरची मेघा कदम एकाकी लढली. ड गटात अमरहिंदने उपनगरच्या नवशक्तीला ३३-२६असे नमविलें. श्रद्धा कदम, तेजश्री सारंग, सुप्रिया म्हस्के अमरहिंद कडून, तर बेबी जाधव, पूर्वा सपकाळ नवशक्ती कडून उत्कृष्ट खेळल्या.

पुरुषांच्या इ गटात उपनगरच्या जॉलीने कोल्हापूरच्या नवभारतला ३१-३०असे चकविले. मध्यांतराला जॉली संघ ०६-२३असा १७गुणांनी पिछाडीवर होता. उत्तरार्धात जॉलीच्या नामदेव इस्वालकर, विशाल राऊत,सचिन तांबे यांनी झंजावाती खेळ करीत या विजय साकारला. योगेश व आशिष या पाटील बंधूंचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात टिकला नाही.

त्यामुळे नवभारत संघ पराभवाच्या खाईत लोटला गेला. ड गटात कोल्हापूरच्या शाहू सडोलीने पालघरच्या श्रीराम संघाला २९-२३असे पराभूत केले. याच गटात अंकुरने देखील श्रीरामला ३६-२६असे पराभूत केल्यामुळे पालघरकरांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. अंकुरच्या या विजयाचे श्रेय सुशांत साईल, अजय देवाडे, अक्षय मिराशी व किसन बोटे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला जाते.

पालघरकरांचा दोन्ही सामन्यात उत्तरार्धात खेळ बहरला,परंतु सुरवात मात्र अडखळत झाली. त्यामुळे ते पराभवाचे धनी झाले. क गटात गोलफादेवीने पुण्याच्या सतेज – बाणेरला ३५-२५असे नमविलें. विराज उतेकर, सिद्धेश पिंगळे, अनिकेत जावरे यांना या विजयाचे श्रेय जाते. सतेज निलेश काळबेरे, आत्माराम कदम या बुजुर्ग खेळाडूंवर किती वर्षे अवलंबून रहाणार?

इतर निकाल – पुरुष १) फ गट अमर वि वि शिवशक्ती (२९-२८); २) अ गट विजय बजरंग वि वि विजय क्लब (२३-१९); ३)जय भारत वि वि गुड मॉर्निग (४१-२८). या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार सचिनभाऊ अहिर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, विद्यमान उपमहापौर हेमांगी वरळीकर, सदानंद शेटे (अर्जुन पुरस्कार प्राप्त) यांच्या उपस्थितीत पार पडला.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया...

संपुर्ण वेळापत्रक- असा आहे विराट कोहलीच्या टीम इंडियाचा आॅस्ट्रेलिया दौरा

तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना

आणि १३ वर्षांचा सचिन झाला चक्क पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक

दिल्ली डेअरडेविल्सकडून तीन मोठ्या खेळाडूंना संघातून डच्चू