प्रेक्षकांमधून मैदानात बूट, काय झालं नक्की चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यात

चेन्नई। चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये आज एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे आयपीएलचा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने कोलकातावर ५ विकेट्सने विजय मिळवला, पण या सामन्यांदरम्यानच एक गोंधळ उडाला जेव्हा प्रेक्षकांमधून बूट मैदानात फेकण्यात आले.

ही बुटे चेन्नईच्या रवींद्र जडेजा आणि फाफ डुप्लेसिसच्या दिशेने आली. ही घटना कोलकाता संघाची फलंदाजी चालू असताना ८ व्या षटकात घडली. जडेजा क्षेत्ररक्षणासाठी लॉन्गऑनला उभा असताना. त्याच्या दिशेने बूट आला. तसेच बाउंड्रीच्या दोरीच्या इथे आलेला बूट फाफ डुप्लेसिस आणि लुंगी इंगिडीने चुकवला.

या घटणेप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. तामिळनाडूमध्ये सध्या कावेरी पाणी प्रश्न बराच पेटला आहे. त्यामुळे आज सुरु असलेला सामना दुसरीकडे हलवावा किंवा रद्द करावा अशी मागणी जोर धरत होती. पण आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्लांनी सामना चेन्नईलाच होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

यामुळे चेन्नईतील वातावरण तापले होते. यासाठीच या सामन्याच्या सुरक्षेसाठी ४ हजार पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण तरीही सामन्यादरम्यान असा लाजिरवाणा प्रकार घडला आहे.