श्रेयस अय्यरला हवी आहे टीम इंडियामध्ये पक्की जागा

देशांतर्गत क्रिकेट सामन्यात शतकांवर शतके केल्यानंतर श्रेयस अय्यर ह्या तरूण प्रतिभावंत खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळाले. अय्यरने आयपीएल तसेच भारतीय संघाकडून खेळलेल्या सामन्यात आपल्या प्रतिभेची झलक दाखवली आहे.

अय्यर हा मघल्या फळीतील चांगला फंलदाज आहे.  सध्या भारतीय संघात मधल्या फळीत सुरेश रैना, मनीष पांडे आणि केदार जाधव यांसारख्या खेळाडूंचा पण समावेश आहे. म्हणून अय्यरला भारतीय संघात आपले स्थान अजून पक्के करण्यासाठी सर्वोच्च कामगिरीची आवश्यकता आहे.

मुंबईच्या ह्या फंलदाजाने टाईम्स ऑफ इंडीयाशी बोलताना म्हटले, “मला अजून चांगले खेळावे लागेल. पण माझी कामगिरी चांगली असून मी भारतीय संघात स्थान मिळवण्यास पात्र आहे.”

” खेळताना सातत्य राखण्याची मला गरज आहे. फंलदाजीच्या संधी बऱ्याच वेळा मला मिळाल्या नाहीत.  दक्षिण आफ्रिकेत मला फक्त दोन वेळा फंलदाजी मिळाली तेही ४०व्या षटकानंतर.”

अलिकडच्या देवधर ट्रॉफीविषयी विचारले असता अय्यर म्हणाला, “मी न घाबरता चांगला खेळत होतो पण अचानक मी तो फटका मारला. मी सारखा विचार करत होतो की तो चेंडू गॅपमध्ये जाईल पंरतू तो क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. मी नुकतीच सुरूवात करत होतो. मला फक्त ३०-४० धावा करण्याची आवश्यकता होती कारण मला खात्री होती की आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहचणार आहोत.”

देवधर ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत-ब संघाने कर्नाटकविरूध्द या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. कर्नाटकने केलेल्या 279 धावांचा पाठलाग करताना करताना अय्यरने 61 धावा केल्या.