श्रीलंकेने रचला इतिहास

आज श्रीलंका संघाने पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत २ सामन्यांची मालिकाही २-० ने जिंकली. श्रीलंकेने पाकिस्तानवर ६८ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला.

या विजयाबरोबरच त्यांनी एक इतिहास रचला आहे. ११५ वर्षांनंतर पहिल्यांदाच दुसऱ्या डावात १०० पेक्षा कमी धावा करणारा संघ कसोटी सामना जिंकला आहे. श्रीलंकेला दुसऱ्या डावात फक्त ९६च धावा करता आल्या होत्या. परंतु त्यांच्या गोलंदाजांनी त्यांचा विजय खेचून आणला.

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी या सामन्याच्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली होती परंतु त्यांच्या फलंदाजांनी कच खाल्ल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. पाकिस्तानकडून एकट्या असद शफिकने शतकी खेळी करून एक बाजू सांभाळली होती पण त्याला बाकीच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही.त्याने ११२ धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलरुवान परेराने ५ बळी घेतले.

त्याचबरोबर नोव्हेंबर २०१५ पासून झालेला हा ६ वा डे-नाईट कसोटी सामना होता आणि विशेष म्हणजे या सर्व सामन्यांचा निकाल लागला आहे.