१९ वर्षांखालील विश्वचषकाचा हिरो विजय हजारे ट्रॉफीमध्येही चमकला

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज पंजाब संघाने कर्नाटकवर अटीतटीच्या लढतीत ४ धावांनी मात केली. या सामन्यात पंजाब संघाचा शुभमन गिलने नाबाद शतक झळकावले. तसेच पंजाबकडून सिद्धार्थ कौलने ३ विकेट घेऊन पंजाबच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

हा सामना पावसामुळे ४२ षटकांचा करण्यात आला होता. पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करून कर्नाटक समोर ४२ षटकात विजयासाठी २७० धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकानेही पंजाबला कडवी झुंज दिली.

कर्नाटकडून केएल राहुलनेही शतकी खेळी केली. त्याने आक्रमक खेळताना ५ षटकार आणि ८ चौकरांच्या साहाय्याने १०७ धावा केल्या. त्याला पवन देशपांडेने चांगली साथ दिली. पवननेही ५३ धावा करत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी मिळून १०० धावांची भागीदारी केली. पण अन्य फलंदाजांनी विशेष काही न केल्याने कर्नाटकला ४२ षटकात ८ बाद २६५ धावाच करता आल्या.

पंजाबकडून सिद्धार्थ कौलने ३, बरिंदर स्रानने २, मयंक मार्कंडे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजी केली. पंजाबची सुरुवात खराब झाली होती. त्यांचा सलामीवीर फलंदाज मनन वोहरा ० धावेवरच परतला होता. मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि मंदीप सिंगने १२५ धावांची शतकी भागीदारी रचत पंजाबला भक्कम स्थितीत पोहोचवले.

नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात मालिकावीर ठरलेल्या शुभमनने आजही त्याचा चांगला फॉर्म राखत १२२ चेंडूत नाबाद १२३ धावा केल्या. यात त्याने ६ षटकार आणि ८ चौकारांची बरसात केली. त्याला भक्कम साथ देणाऱ्या मंदीपनेही ६४ धावा करत अर्धशतक केले.

पंजाब संघाचा कर्णधार युवराज सिंगही आक्रमक खेळत होता. मात्र तो २८ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. पंजाब संघाने शुभमन आणि मंदीप यांच्या खेळीच्या जोरावर ४२ षटकात ३ बाद २६९ धावा केल्या.

कर्नाटकडून कर्णधार विनय कुमारने २ तर प्रदीपने १ विकेट घेतली.