रोन्देवुझ अ रोलँड-गॅरोस टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत सिद्धांत बांठिया, मल्लिका मराठे यांना विजेतेपद

पुणे, दि.1 एप्रिल  2017-  पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे व एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित रोन्देवुझ अ रोलँड-गॅरोस टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात मल्लिका मराठे, श्राव्या शिवानी यांनी, तर मुलांच्या गटात सिध्दांत बांठीया  या  महाराष्ट्राच्याखेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात बिगरमांकित व क्वालिफायर मल्लिका मराठे हिने अव्वल मानांकित श्राव्या शिवानीचा ६-४, ६-३ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद मिळवले. १तास ३मिनिटे चाललेल्या या सामन्यात मल्लिका मराठे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत  श्राव्या शिवानीची चौथ्या आणि दहाव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ६-४ असा जिंकला. पिछाडीवर असलेल्या श्राव्याला शेवटपर्यत सूर गवसला नाही. दुसऱ्या सेटमध्ये मल्लिकाने सुरेख व चतुराईने खेळ करत श्राव्याची दुसऱ्या, चौथ्या आणि आठव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट ६-३ असा विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यावेळी मल्लिका म्हणाली की, मी माझा सर्वोत्तम खेळ केला, पॉईंट्स गमावल्यानंतरही मी त्याचे दडपण घेतले नाही. श्राव्या हि अनुभवी खेळाडू असून तिला पराभूत करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण आता मी दिल्ली येथे होणाऱ्या मास्टर्स स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणार आहे.

 मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित सिद्धांत बांठियाने दुसऱ्या मानांकित रिषभ शारदा याचा ६-२, ६-१ असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. १तास ४मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिद्धांत याने आपले वर्चस्व कायम राखत पहिल्या सेटमध्ये रिषभची दुसऱ्या, आठव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट ६-२ असा जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये देखील सिद्धांतने रिषभपेक्षा वरचढ खेळ केला. सिद्धांतने रिषभची गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट ६-१ अशा फरकाने जिंकून विजय मिळवला. यावेळी सिद्धांत म्हणाला कि, दुसरा सेट हा माझ्यासाठी आवहनात्मक होता, पण मी लक्ष केंद्रित करून खेळलो  आणि मिळालेल्या  संधीचा अचूक फायदा घेतला. यामुळे मी खूप आनंदी असून मास्टर्स स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक आहे.

कोलकत्ता आणि पुणे येथील विजेते नवी दिल्ली येथे १७,१८,१९ एप्रिल रोजी होणाऱ्या मास्टर्स स्पर्धा खेळणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष विजय भावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव हिमांशू गोसावी, लीना नागेशकर आणि अवनी गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 स्पर्धेचा सविस्तर निकालः एकेरी गट: अंतिम  फेरीः मुले

सिध्दांत बांठीया(1) वि.वि. रिषभ शारदा(2) ६-२, ६-१;

मुलीः मल्लिका मराठे वि.वि.श्राव्या शिवानी(1)६-४, ६-३.