प्रेक्षकांनी उडवलेल्या खिल्लीबद्दल शतकवीर स्टिव्ह स्मिथ म्हणाला…

2019 विश्वचषकातील तिसरा सराव सामना काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडला 12 धावांनी पराभूत केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी केली.

त्याने या सामन्यात 102 चेंडूत 116 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 3 षटकार मारले. परंतू त्याआधी या सामन्यात त्याला आणि डेव्हिड वॉर्नरला प्रेक्षकांनी उडवलेल्या खिल्लीला सामोरे जावे लागले होते.

या दोघांवरही मागीलवर्षी मार्चमध्ये चेंडू छेडछाड प्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 1 वर्षांची बंदी घातली होती. पण ही बंदी आता उठली आहे. त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषकासाठी पुनरागमनही केले आहे.

मात्र या प्रकरणावरुन या दोघांचीही ‘चिटर, चिटर’ असे ओरडत प्रेक्षकांनी निंदा केली होती. पण या दोघांनीही या सामन्यात चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले. वॉर्नरनेही सलामीला येत 43 धावांची छोटेखानी खेळी केली. तर तो बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या स्मिथनने शतकी खेळी केली.

या सामन्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना स्मिथने याचा काही फरक पडत नसल्याचे म्हटले आहे. cricket.com.au ने दिलेल्या वृत्तानुसार स्मिथ म्हणाला, ‘मी फलंदाजीला येताना काही गोष्टी ऐकल्या होत्या. पण मी खाली डोके घेऊन सरळ पुढे निघून आलो आणि माझे काम केले.’

तसेच तो म्हणाला, ‘मला त्याचा काही फरक पडत नाही. मला फक्त माझे काम करायचे होते आणि मला माहित आहे मला बाल्कनीमधून माझ्या संघसहकाऱ्यांचा पाठिंबा मिळत होता. माझ्यासाठी ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना आणि ऑस्ट्रेलियन्सला अभिमान वाटेल अशी मला शक्य असेल एवढी मैदानात चांगली कामगिरी करणे हे माझे काम आहे.’

‘सुदैवाने मी आज माझ्या संघासाठी काही धावा करु शकलो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वचषकातील आमच्या पहिल्या सामन्याआधी मी खेळपट्टीवर काही वेळ व्यतीत केला.’

त्याचबरोबर स्मिथ म्हणाला, ‘आशा आहे की मुख्य स्पर्धेतही असाच फॉर्म कायम राहिल. पण मला खेळपट्टीवर चांगले आणि शांत वाटत आहे. ऑस्ट्रेलियासाठी शतक करणे ही केव्हाही सन्मानाची गोष्ट आहे.’

या सामन्यात इंग्लंडचे प्रभारी नेतृत्व करणारा जॉस बटलरनेही स्मिथचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, ‘तो सारखाच खेळाडू आहे. जसा तो 12 महिन्यांपूर्वी होता आणि तो अजूनही तसाच आहे. तो विसरलेला नाही. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.’

इंग्लंडचा नियमित कर्णधार इयान मॉर्गन दुखापतीमुळे या सामन्यात खेळला नाही. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व बटलरने केले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

काय सांगता! चक्क इंग्लंडचा प्रशिक्षकच खेळाडू म्हणून उतरला मैदानात

जडेजाच्या अर्धशतकानंतर चाहत्यांनी केले असे जोरदार सेलिब्रेशन, पहा व्हि़डिओ

रविंद्र जडेजाचे न्यूझीलंड विरुद्ध शानदार अर्धशतक, अन्य फलंदाजांची कामगिरी मात्र सुमार