स्मिथ, वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची एक वर्षांची बंदी

केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील चेंडू छेडछाड प्रकरण सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलेच गाजत आहे. या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत.

काल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळलेले माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आज त्यांनी त्यांच्या निलंबनाचा कालावधीही घोषित केला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाप्रमाणे स्मिथ आणि वॉर्नरवर एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच बॅनक्रोफ्टवर ९ महिन्यांची बंदीची कारवाई झाली आहे. या तीनही खेळाडूंना त्यांच्या बंदीच्या काळात फक्त क्लब क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण क्लब क्रिकेट व्यतिरिक्त त्यांना बाकी कोणत्याही क्रिकेटचे सामने खेळता येणार नाही.

या तीनही खेळाडूंना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणाच्या चौकशीनंतर काल ऑस्ट्रेलियाच्या आचार संहितेच्या कलम २.३.५ चा भंग केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. तसेच त्याआधी आयसीसीने स्मिथवर १००% दंडाची आणि एका सामन्याच्या बंदीची कारवाई केली होती. तर बँक्रॉफ्टला ७५ %दंड आणि ३ डेमीरीट पॉईंट्स दिले होते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा ३० मार्च पासून शेवटचा आणि चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाने स्मिथ, बॅनक्रोफ्ट आणि वॉर्नरचे बदली खेळाडू म्हणून ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू रेनशॉ आणि जो बर्न्स या तीन खेळाडूंना तातडीने दक्षिण आफ्रिकेत बोलावून घेतले आहे.

याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांना निर्दोष घोषित केले आहे. त्यामुळे ते ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रशिक्षक पदावर कायम राहतील.