धक्क्यांचे सत्र काही संपेना!

चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळलेले ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट यांच्या समोर संकटांचा डोंगर उभा राहिला आहे. या प्रकरणानंतर त्यांना मिळणाऱ्या धक्क्यांचे सत्र काही संपायचे नाव घेत नाहीये.

आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नरच्या नेतृत्वावरही गदा आणली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले की स्मिथला कमीत कमीत दोन वर्ष तरी कर्णधारपद भूषवता येणार नाही. तर वॉर्नरला आजीवन कर्णधारपद स्वीकारता येणार नाही.

तसेच या दोघांच्या आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यावरही एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्मिथला बंदी संपल्यानंतर पुढील एक वर्ष तरी कर्णधारपदाची सूत्रे हाती घेता येणार नाही .यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला पुढील काही सामन्यांमध्ये चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे.

काल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणाच्या चौकशीनंतर ऑस्ट्रेलियाच्या आचार संहितेच्या कलम २.३.५ चा भंग केल्याप्रकरणी स्मिथ, बॅनक्रोफ्ट आणि वॉर्नर यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांनी टीम पेन या यष्टीरक्षक खेळाडूची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावर नियुक्ती केली आहे.

त्याचबरोबर स्मिथ आणि वॉर्नर यांच्या पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल २०१८ च्या सहभागावरही बीसीसीआयकडून बंदी घालण्यात आली आहे.