महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खणखणीत खेळी

दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघ यांच्यात आज पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाने खणखणीत अर्धशतक झळकावताना भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे.

स्मृती आणि पूनम राऊत यांनी ५५ धावांची सलामी दिली होती मात्र पूनम १९ धावांवरच बाद झाली. त्यानंतर स्मृतीने कर्णधार मिताली राजला साथीला घेत भारताच्या डावाला आकार देण्यास सुरुवात केली. तिने ९८ चेंडूत ८४ धावांची खेळी करताना ८ चौकार आणि १ षटकार मारले आहेत. तसेच तिने मिताली बरोबर ९९ धावांची भागीदारी केली.

भारतीय महिला संघ आज जवळ जवळ ६ महिन्यांनी आंतराष्ट्रीय सामना खेळत आहे. याआधी भारतीय संघ जुलैमध्ये विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर महिला संघाचा एकही आंतराष्ट्रीय सामना झालेला नाही.

या विश्वचषकात भारताने अंतिम सामन्यात धडक मारली होती. तसेच मानधनाने या स्पर्धेत आठ सामन्यांमध्ये एक अर्धशतक तर एक शतक झळकावले होते. मात्र बाकी सामन्यात तिला खास काही करता आले नव्हते. परंतु तिने आज पुन्हा अर्धशतक करून ती चांगल्या फॉर्ममध्ये आहे हे दाखवून दिले आहे.

सध्या सुरु असलेली ही वनडे मालिका आयसीसी चॅम्पिअनशिपचा भाग आहे. आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत भारताने ५० षटकात २१३ धावा करून दक्षिण आफ्रिकेला २१४ धावांचे आव्हान दिले आहे.

भारताकडून मानधना आणि मिताली राज(४५) या दोघींनीच चांगली कामगिरी केली आहे. बाकी फलंदाजांना काही खास करता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मॅरिझिना कप आणि आयबॉन्ग खाया यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या आहेत.