सांगलीकर स्म्रिती मानधनाची धमाकेदार शतकी खेळी

दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघ यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज स्म्रिती मानधनाने दमदार शतक केले आहे. तिच्या या शतकामुळे भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे.

तिचे हे वनडे कारकिर्दीतील ३रे शतक आहे. सध्या भारतीय संघाने ४८ षटकांत ३ बाद २७३ धावा केल्या आहेत.

स्म्रितीने या सामन्यात १०४ च्या स्ट्राईक रेटने खेळताना १२९ चेंडूत १३५ धावांची खेळी केली आहे. या खेळीत तिने १४ चौकार आणि १ षटकार मारला आहे. तिला आक्रमक फलंदाज हरमनप्रीत कौरने चांगली साथ दिली. या दोघींनी मिळून १३४ धावांची भागीदारी रचली.

स्म्रितीने पहिल्या वनडे सामन्यातही ८४ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली होती. यामुळे ती चांगल्या फॉर्ममध्ये परतली आहे याची प्रचिती तिने दिली होती.या पहिल्या वनडेत भारताने ८८ धावांनी मोठा विजय मिळवला होता.

आज हरमनप्रीतनेही अर्धशतक केले आहे. तसेच ती अजूनही नाबाद खेळत आहे. मात्र आज पूनम राऊत(२०) आणि कर्णधार मिताली राज(२०) मात्र लवकर बाद झाल्या.