सोशल मीडिया आणि लाईव्ह कव्हरेजमुळे महिला क्रिकेटचे रूप बदलले: मिताली राज

नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज मंगळवारी एका मुलाखती दरम्यान म्हणाली की सोशल मीडिया आणि टीव्हीवर लाइव्ह कव्हरेजमुळेच महिला क्रिकेटचे संपूर्ण स्वरूप बदलले आहे.

मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने २०१७च्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती. अंतिम सामन्यात लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात यजमान संघ इंग्लंडने भारताला पराभूत केले आणि विश्वचषक आपल्या नावावर केला. भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची ही दुसरी वेळ होती. २००५ सालीसुद्धा मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता.

“२००५ मध्ये जेव्हा आम्ही अंतिम सामन्यात पोहोचलो तेव्हा त्या सामन्यांचे लाइव्ह कव्हरेज झाले नाही. आमच्याकडे त्या सामन्यांचे व्हिडिओसुद्धा नाही. आमच्याकडे फक्त त्या सामन्यांच्या आठवणी आहेत. पण यावेळी मात्र असे झाले नाही. सोशल मीडियावर तसेच लाइव्ह टेलिव्हिजन कव्हरेजमुळे आम्हाला खूप जास्त लोकप्रियता मिळाली. संपूर्ण देशाचे लक्ष भारतीय महिला संघाकडे वळले आणि त्यामुळेच भारतीय महिला क्रिकेटचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले.

त्याचबरोबर मितालीने आधीच्या महिला क्रिकेटपटूच्या खडतर आयुष्याबद्दल ही सांगितले, “९०च्या दशकात क्रिकेट जगणे खूप अवघड होते. १६ वर्षाखालील आणि १९ वर्षांखालील सामन्यांसाठी आम्हाला ट्रेनमध्ये रिझर्वेशन सुद्धा मिळायचे नाही. आम्हाला सध्या हॉटेलमध्ये थांबावे लागायचे. ही गोष्ट तोपर्यंत चालू राहिली जोपर्यंत महिला क्रिकेट हे वुमन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत होते.

“अमेरिकेसारख्या विकसित देशात खेळाडूंवर खूप खर्च केला जातो आणि त्याला ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी तयार केले जाते पण भारतात असे होत नाही भारतात तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप मोठी कामगिरी करायला लागते आणि तेव्हाच तुम्हाला सरकारचे पाठबळ मिळते.”