चेंडू छेडछाड प्रकरणावर या आजी माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया वाचाच

केपटाऊन येथे पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने ३२२ धावांनी जिंकला आणि ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मात्र या विजयापेक्षा हा कसोटी सामना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेल्या चेंडू छेडछाडीच्या लाजिरवाण्या प्रकारामुळे जास्त गाजला.

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हा सर्व प्रकार घडला. त्यानंतर दिवसाखेर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने आणि सलामीवीर फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रोफ्टने चेंडूंबरोबर छेडछाड केल्याचे मान्यही केले.

त्यामुळे या प्रकारचे पडसाद काल क्रिकेट वर्तुळात चांगलेच उमटले. तसेच स्मिथ, बॅनक्रोफ्ट आणि ऑस्ट्रेलियन संघावर सर्वच स्थरातून टीका करण्यात आली. यात सोशल मीडियावर आजी माजी क्रिकेटपटूनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यामध्ये काहींनी ऑस्ट्रेलिया संघावर तिखट शब्दात टीका केली. तर मायकल क्लार्कने हे वाईट स्वप्नासारखे असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणामुळे स्मिथला कर्णधार पदावरून तर डेव्हिड वॉर्नरला उपकर्णधार पदावरून पायउतार व्हावे लागले. तसेच स्मिथवर आयसीसीने १००% दंडाची आणि १ सामन्याच्या बंदीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर बॅनक्रोफ्टला ७५% दंड आणि ३ डेमीरीट पॉईंट्स आयसीसीने दिले आहेत.