अजिंक्य रहाणेच्या फॉर्मची चिंता नाही- सौरव गांगुली

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबद्दल चिंता नसल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याबद्दलही मते व्यक्त केली आहेत.

रहाणेने श्रीलंकेविरुद्ध ५ डावात १७च धावा केल्या असल्याने अनेकांनी त्याच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली होती. पण रहाणेची आजपर्यंतची कारकीर्द बघता त्याने भारताबाहेर खेळताना चांगली कामगिरी केली आहे.

यावर गांगुली म्हणाला, “मला नाही वाटत अजिंक्य रहाणेचा फॉर्म चिंताजनक आहे, तो एक चांगला खेळाडू आहे. विराट कोहली, रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय हे सगळे दक्षिण आफ्रिकेत जाऊन आलेले आहेत आणि चांगली गोष्ट ही आहे की ते पुन्हा दक्षिण आफ्रिकेला उत्कृष्ट खेळाडू म्हणून जात आहेत.”

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात संधी मिळालेल्या गोलंदाजांबद्दल गांगुली म्हणाला, ” ही गोलंदाजांची फळी उत्तम आहे कि नाही हे आपल्याला लवकरच कळेल. पण या गोलंदाजांना तिथे वेग मिळेल हे नक्की. उमेश यादवकडे चांगला वेग आहे, भुवनेश्वर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे आता वाट बघूया. “

याबरोबरच हार्दिक पांड्याला ६ व्या क्रमांकावर खेळवण्यासाठी गांगुलीने विरोध केला नाही. काहींनी उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर पंड्याच्या खेळाच्या तंत्रावर शंका घेतली आहे. गांगुली त्याबद्दल म्हणाला ” हार्दिकला संधी दिल्या शिवाय तुम्हाला ते कळणार नाही. हे त्याच्या कडून तुम्हाला काय हवे आहे त्यावर अवलंबून आहे.”

गांगुली रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या बद्दल बोलताना म्हणाला, “रोहितने त्याला मिळालेल्या दोन संधींमध्ये चांगला खेळ केला आहे. जर खेळपट्टी फ्लॅट असेल तर तुम्हाला ११ जणांच्या संघात एक जास्तीचा गोलंदाज खेळवावा लागेल पण जर खेळपट्टी गवत असलेली भेटली तर जास्तीचा फलंदाज खेळवावा लागेल. धवन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच मुरली विजयही श्रीलंकेविरुद्ध चांगला खेळला आहे.”

पुढे गांगुली म्हणाला “भारतीय संघ चांगला आहे. पण हा दौरा सोपा नसेल. जर फलंदाजांनी चांगल्या धावा केल्या तर गोलंदाजांना बळी मिळतील.”

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा ५ जानेवारी पासून सुरु होणार आहे.