तिसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेला सलग ५ धक्के

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचीही पहिल्या डावात काही खास कामगिरी झालेली नाही. त्यांनी ४१.४ षटकातच १०७ धावात ५ बळी गमावले आहेत.

पहिल्या डावात भारताच्या भुवनेश्वर कुमारने आत्तापर्यंत ३ बळी घेतले आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर डीन एल्गार(४) आणि एडन मार्करम(२) यांना झेलबाद केले. या दोघांचाही यष्टीरक्षक पार्थिव पटेलने झेल घेतले.

तसेच भुवनेश्वरने आज दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सलाही(५) त्रिफळाचित करून बाद केले. डिव्हिलियर्स या कसोटी मालिकेत ५ डावांमध्ये तिसऱ्यांदा त्रिफळाचित झाला आहे.

या डावात या तीन बळी घेणाऱ्या भुवनेश्वरला दुसऱ्या कसोटीसाठी मात्र संघाबाहेर ठेवण्यात आले होते पण त्याने हे महत्वाचे तीन बळी मिळवून त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे.

इशांत शर्माने काल नाईट वॉचमन म्हणून खेळायला आलेल्या कागिसो रबाडाला बाद केले. पण राबाडाने नाईट वॉचमन असूनही ८४ चेंडू खेळून ३० धावा केल्या याचे सर्वांनी कौतुक केले.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डूप्लेसिसलाही(८) आज काही खास करता आले नाही. त्याला बुमराहने सुरेख चेंडू टाकून त्रिफळाचित केले.